अमळनेर : ब्रिटिशकालीन फड बंधाऱ्यातून सोडलेले पाणी भाल्या नाल्यापर्यंत पोहचल्याने तब्बल २५ वर्षांपासून कोरड्या असलेल्या विहिरी झिरपू लागल्याने सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. हे बंधारे दुरुस्त होऊन भाल्या आणि लौखी दोन्ही नाल्यांचे काम पूर्ण झाल्यास तालुक्यातील साडे चार हजार हेक्टर शेतीला व ३५ गावांना फायदा होणार आहे, अशी माहिती पंचायत समिती माजी सभापती डॉ. दीपक पाटील यांनी दिली.गेल्या अनेक वर्षांपासून अमळनेर तालुक्यातील भाल्या आणि लौखी या दोन नाल्यांमधून पांझरा नदीचे पाणी सोडण्यात यावे ही मागणी जोर धरत होती. त्याला आमदार स्मिता वाघ यांनी पुष्टी दिली आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव व धुळे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावून पांझरा- माळण नदी जोड, मांडळ व मुडी फड बंधारे दुरुस्ती, नाला खोलीकरणाच्या सर्वेक्षणसाठी २० लाख रुपये मंजूर केले आणि धुळे जिल्ह्याने निधी नसताना यांत्रिक विभागाच्या मदतीने विविध यंत्र वापरून नाले खोलीकरण सुरू केले आणि योगायोगाने पांझरेचे आवर्तन सोडण्यात आले. यात तूर्त दीड किमी पर्यंत झालेल्या कामाची चाचणी घेण्यात आली व ती यशस्वी झाली.खान्देशातील पांझरा, मोसम, बोरी, बुराई, गोमाई आदी मोजक्या नद्यांवर अनेक वर्षांपासून ब्रिटिशकालीन, होळकर कालीन बंधारे असून या बंधाऱ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे कुठलीही ऊर्जा न वापरता कमी अधिक प्रवाहातदेखील पाण्याला वळण देऊन नदी काठावरून इतर नाले व चारीतून पाणी परिसरात पोहचते. यात पाणी वाया जात नाही आणि नदी व नाले दोघे ठिकाणी प्रवाह सुरू राहतो त्यामुळे परिसरात पाणी पातळी वाढून शेतीलाही उपयोगी पडते.मात्र हे बंधारे ३० ते ४० वर्षांपासून नादुरुस्त झाले असल्याने नद्यांमधून पाणी वाहून जात होते. अखेर नागरिकांच्या मागणीप्रमाणे जलतज्ज्ञ व्ही. डी. पाटील यांनी पाहणी करून ही दुरुस्ती केल्यास पाण्याचे प्रश्न सुटतील असे सांगितले.नाला खोलीकरणामुळे काही गावांमध्ये रस्त्यात नाला आल्याने मोºया बंधाव्या लागतील तसेच काही ठिकाणी तुटलेले बंधारे, नाले गळती दुरुस्ती करावी लागणार आहे. मांडळ येथे तर गावातूनच पाटचारी गेली आहे, ती दुरुस्त करावी लागेल. त्यामुळे अनेक वर्षानंतर गावातून पाणी वाहणार आहे. या फड बंधाºयांमुळे मांडळ, मुडी, लोण, लोण सिम, लोण बुद्रुक, लोण पंचम, एकलहरे, एकतास, शहापूर, भिलाली आदी गावातून पुन्हा पाणी पांझरेत सोडले जाणार आहे.त्याचप्रमाणे पांझरा नदीवर धुळे परिसरात बंधारा बांधून पाईप लाईनद्वारे पाणी डांगर येथे पांझरेत सोडण्यात येणार असून या प्रकल्पाची कार्यवाही सुरू झाली आहे.
अमळनेरात कोरड्या विहिरींना पाझर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 12:45 AM