ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 14- जिल्हा रुग्णालयातील अतिक्रमण काढणे बुधवारी दुस:या दिवशीही सुरूच होते. या ठिकाणी वीज व पाणीपुरवठादेखील होता. तो खंडीत करण्यात आला असून अनाधिकृत निवासस्थानांच्या या परिसरात आता अंधार पसरलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अतिक्रमणधारकांकडून वीज व पाणी वापरले जात होते. ही बाब समोर आल्याने अतिक्रमण काढताना वीज व पाणीपुरवठा तोडण्यात आला. अतिक्रमण काढताना वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील हे दोन दिवसांपासून येथे ठाण मांडून आहेत. सोबतच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण हेदेखील लक्ष ठेवून होते.
जिल्हा रुग्णालयातील निवासस्थाने खाली झाल्यानंतरही तसेच असलेले अतिक्रमण मंगळवारी जमीनदोस्त करण्यात आले. मात्र येथे असलेले अधिकृत निवासस्थाने पाडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे नवीन निवासस्थाने बांधायची असली तरी जुनी घर पाडताना परवानगी आवश्यक ठरणार आहे. जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत झाल्यानंतर येथे मोठे बदल व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. यामध्ये आता येथील निवासस्थाने जीर्ण झाल्याने ते पाडून त्या ठिकाणी फ्लॅट सिस्टीमनुसार कमी जागेत जास्त निवासस्थाने उभारण्यात येणार असून उर्वरित जागेत शासकीय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल तसेच महिला व बाल रुग्णालय उभारण्यास प्राधान्य राहणार आहे. येथील निवासस्थानांचे 1939 साली बांधकाम करण्यात आले असून ते जीर्ण झाले आहेत. त्यामुळे ते पाडून नवीन निवासस्थाने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार गेल्या महिन्यात येथील रहिवाशांना नोटीस देण्यात आल्या होत्या. त्यानुसार येथील 84 निवासस्थाने रिकामी करण्यात आली. या ठिकाणी जवळपास 100 अतिक्रमण केलेली घरे होती. ती पाडण्याची प्रक्रिया हाती घेऊन मंगळवारी हे अतिक्रमण जेसीबीद्वारे पाडण्यात आले. असे असले तरी अधिकृत 84 निवासस्थाने पाडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निवासस्थाने पाडण्याच्या परवानगी घ्यावी लागणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात महिला व बाल रुग्णालय असावे म्हणून निवासस्थानांची उभारणी झाल्यानंतर असे रुग्णालय तसेच वेअर हाऊस उभारण्याचाही प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
जिल्हा रुग्णालय परिसर अंधारातअतिक्रमण धारकांचा वीज पुरवठा खंडीत करताना काही वीजवाहक तारा तुटल्या. यामुळे जिल्हा रुग्णालय परिसरातील वाहनतळ व समोरील भागातील विजेचे दिवे बंद पडल्याने या परिसरात अंधार पसरला होता. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे हाल झाले. रुग्णालयात मात्र वीजपुरवठा सुरू होता.