लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात अनेक भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणांची समस्या निर्माण झाली आहे. यासह महामार्गालगत देखील अनेक विक्रेत्यांनी दुकाने थाटल्याने नेहमी वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. महामार्गालगतचे अतिक्रमण काढण्याचा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या होत्या. त्यानुसार लवकरच महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर कारवाई केली जाणार असून, गुरुवारी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी व उपायुक्त संतोष वाहुळे यांनी शहरातील विविध भागात जावून अतिक्रमणांची पाहणी केली. तसेच महामार्गालगत देखील पाहणी केली असून, आयुक्तांनी अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमण निर्मुलन विभागाला सूचना दिल्या आहेत.
शहरातील रस्त्यालगत अनधिकृत विक्रेत्यांनी कब्जा केला आहे. या विक्रेत्यांमुळे आता रस्त्यालगत नेहमी वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत असून, या अतिक्रमणांवर कारवाईची मागणी केली जात आहे. त्यातच मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत महामार्गालगतच्या अतिक्रमणांच्या विषयावर देखील चर्चा झाली. यावेळी ‘नही’ च्या अधिकाऱ्यांनी महामार्गालगत अतिक्रमण वाढले आहे. मात्र, हे अतिक्रमण काढण्याचे अधिकारी ‘नही’ ला नाहीत. त्यामुळे मनपा व पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नही च्या अधिकाऱ्यांनी केली होती. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाला महामार्गालगतचे अतिक्रमण काढण्याचा सूचना दिल्या होत्या.
प्रत्यक्ष पाहणी करून, आयुक्तांनी दिले आदेश
मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी व उपायुक्त संतोष वाहुळे यांनी गुरुवारी सकाळी १० वाजता कालंका माता चौक ते खोटेनगरपर्यंतच्या रस्त्यालगतच पाहणी केली. यामध्ये अजिंठा चौफुली, गुजराल पेट्रोल , इच्छादेवी चौक या भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाची समस्या निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले. यासह याच अतिक्रमणामुळे वाहतूककोंडीची देखील समस्या निर्माण होत असल्याने आयुक्तांनी लवकरात हे अतिक्रमण काढण्याचा सूचना दिल्या आहेत. यासह शहरातील मुख्य रस्त्यालगतचे अतिक्रमण देखील काढण्याचा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
गुजराल पेट्रोलपंप परिसरातील अतिक्रमणधारकांवर कारवाई
गुजराल पेट्रोल पंप परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. अनेक विक्रेत्यांनी महामार्गालगतच व्यवसाय थाटले आहेत. उपायुक्त संतोष वाहुळे यांनी या भागात पाहणी केल्यानंतर तत्काळ कारवाईचे आदेश काढले. दुपारी १२ वाजता मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या पथकाने थेट कारवाई करत १८ अनधिकृत हॉकर्सचा माल जप्त केला. यासह वाहतुक शाखेला देखील या भागातील रिक्षा चालकांवर कारवाई करण्याचे पत्र मनपा प्रशासनाने पाठविले आहे.