जळगाव : बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानांतर्गत जिल्ह्यात गर्भलिंग निदान व स्त्री भ्रूणहत्या प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज दिल्यात.
बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेत पार पडली.
जिल्ह्यात ३३४ नोंदणीकृत सोनोग्राफी सेंटर असून १५४ केंद्र कार्यरत आहेत. या केंद्रांची वेळोवेळी तपासणी करण्यात येत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी बैठकीत सांगितले.
पीडित महिलांच्या अडचण सोडविण्यासाठी त्यांनी १८१ या क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्ह्यात वन स्टॉप सेंटर सुरू करण्यात आले आहे.
यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त य. कों. बेंडकुळे, विधी प्राधिकरणाचे सचिव ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे, तडवी उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यात मुलींचे गुणोत्तर ९२० इतके आहे. सध्या हे प्रमाण वाढले असून यात अजून वाढ होण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येत असल्याचेही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय सिंग परदेशी यांनी बैठकीत सांगितले.