लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मराठी शाळांमध्ये पटसंख्या टिकविणे इंग्रजी शाळांमुळे कठीण झाले आहे. मात्र, आता कार्यपद्धतीत बदल करून आम्ही इंग्रजी शाळांपेक्षा उत्तम शिक्षण देऊ शकतो, हे पटवून विद्यार्थ्यांना, पालकांना पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे प्रवृत्त करून इंग्रजी शाळांमधील विद्यार्थी फोडावे लागतील, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्हा शिक्षक सेनेतर्फे आयोजित जिल्हा परिषद आदर्श शिक्षक गौरव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
जिल्हा परिषदेकडून आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले; मात्र, दोन वर्षांपासून पुरस्कार वितरण सोहळा झालेला नव्हता. त्या पार्श्वभूमीवर रविवारी या आदर्श शिक्षकांचा गौरव सोहळ्याचे शिक्षक सेनेकडून कांताई सभागृहात आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. यासह व्यासपीठावर आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, महापौर जयश्री महाजन, पंचायत समिती सभापती ललिता पाटील, माजी आमदार शिवसेना सहसंपर्कप्रमुख प्रा.चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने, जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, जनार्दन कोळी, शिक्षकसेना जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, उर्दू विभागाचे प्रमुख इलियाज शेख, मनोज पाटील, उपशिक्षणाधिकारी विजय पवार आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस नाना पाटील यांनी केले. शिक्षकांच्या पगारांचा प्रश्न मार्गी लावल्याने त्यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले. मात्र, मेडिकल बिलांचा विषय गंभीर असून, आजारातून बरा झालेला शिक्षक मेडिकल बिलांसाठी फिरून पुन्हा आजारी पडतो, अशी व्यथा नाना पाटील यांनी मांडली. शिक्षक सेनेकडून माध्यमिक जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, कार्याध्यक्ष गोविंदा पाटील, राज्य प्रतिनिधी महेंद्रसिंह पाटील, कार्याध्यक्ष संदीप पवार, संपर्क प्रमुख नवल चौधरी, उपाध्यक्ष सुनील चौधरी यांनी परिश्रम घेतले.
इंग्रजी शाळांकडून मोठे शोषण
शिक्षकांचे इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून कमी पगार देऊन मोठे शोषण होत असल्याचा मुद्दा आमदार चिमणराव पाटील यांनी मांडला. शिक्षणावर खूप कमी खर्च होत असून, याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती बिकट असून, सुविधा नसल्याने पटसंख्या घटत असल्याचा मुद्दा आमदार किशोर पाटील यांनी मांडला. यासह चंद्रकांत सोनवणे, महापौर जयश्री महाजन, सभापती ललिता पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.