ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 13- धनत्रयोदशी, पाडवा व भाऊबीजच्या मुहूर्तावर दुचाकी व चारचाकी वाहन मिळावे म्हणून बकिंगसाठी बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी वाढली आहे. दररोज 25 ते 30 चारचाकी तर 60हून अधिक दुचाकींचे बुकिंग होत आहे.
दिवाळीचा मुहूर्त साधण्यासाठी दुचाकी व चारचाकीच्या खरेदीसाठी जोरात बुकिंग करण्यात आले आहे. धनत्रयोदशीला जास्त विक्री होते त्यामुळे या मुहूर्तावर एक हजार पेक्षा जास्त दुचाकींची विक्री होणार असल्याचे सांगण्यात आले. आतार्पयत 650 दुचाकींचे बुकिंग झालेले होते. आठवडाभरात ही संख्या आणखी वाढणार असल्याचे सांगण्यात आले.
दुचाकीसोबतच चारचाकी वाहनांची विक्रीदेखील तेजीत आहे. शहरातील एकाच दालनामध्ये दररोज 15 ते 20 चारचाकींची बुकिंग करण्यात येत आहे. त्या इतर दालानांमध्येही चांगली बुकिंग असल्याची माहिती मिळाली. धनत्रयोदशीला 400 चारचाकींची विक्री अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले. बुकिंग जोरात सुरू असले तरी चारचाकी वाहने कमी पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
धनत्रयोदशी व भाऊबीजच्या मुहूर्ताला चारचाकी खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात बुकिंग करण्यात येत असून दररोज 15 ते 20 चारचाकी कारचे बुकिंग होत आहे. - उज्जवला खर्चे, विक्री व्यवस्थापक, मानराज मोटर्स.
दुचाकींच्या बाजारपेठेत चैतन्याचे वातारण आहे. दिवाळीसाठी चांगले बुकिंग होत असून आतार्पयत 650 दुचाकींचे बुकिंग झालेले आहे. - अमित तिवारी, महाव्यवस्थापक, राम होंडा.