लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. यामुळे नागरिकांकडून मनपा प्रशासनासह विद्यमान व तत्कालीन सत्ताधाऱ्यांकडेदेखील शहरातील रस्त्यांची स्थिती सुधारण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मनपातील नवीन सत्ताधाऱ्यांनी ४२ कोटींमधील तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी केलेल्या कामांचे प्रस्ताव रद्द करून, त्या निधीतून सर्व कामे ही रस्त्यांची केली जाणार असल्याची माहिती शिवसेनेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर नगरोत्थान अंतर्गत महापालिकेला १०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. मात्र या निधीतून तत्कालीन सत्ताधाऱ्यांना दोन वर्षांत कामेदेखील सुचविता आलेली नव्हती. त्यातच महापालिकेने शंभर कोटी रुपयांचा कामाचे प्रत्येकी ५०-५० कोटी रुपयांचे दोन प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवले होते. मात्र, यामधील केवळ ४२ कोटींच्या कामांना शासनाकडून मंजुरी मिळाली होती. त्यातच राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर ४२ कोटींच्या कामांसह उर्वरित ५८ कोटींच्या कामांनाही राज्यशासनाने स्थगिती आणली होती. आता महापालिकेत शिवसेनेची सत्ता आल्याने या ४२ कोटींच्या कामावरील स्थगिती उठण्याची शक्यता आहे.
कंपाउंड वॉल, चैनलिंक फेन्सिंगची अनावश्यक कामे रद्द करणार
१. शहरात मुख्य समस्या ही रस्त्यांची आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी म्हणून आमची जबाबदारी शहरातील रस्त्यांची दुरवस्था सुधारण्याची आहे, अशी माहिती शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी लोकमतला दिली. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी ४२ कोटींचा निधीमधील तब्बल २२ कोटींची तरतूद कंपाउंड वॉल तयार करणे, खुल्या भूखंडांना चैनलिंक फेन्सिंग बसविणे अशा कामांवर केली होती.
२. तर शहरातील नागरिक ज्या समस्येने ग्रासलेले आहेत त्या रस्त्यांच्या समस्यांसाठी केवळ १६ कोटींची तरतूद तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी केली होती. मात्र शहरातील मुख्य समस्या ओळखून या निधीमधील अनावश्यक कामे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आता या ४२ कोटींचा निधीमधील सर्व कामे ही शहरातील रस्त्यांची करण्यात येणार असल्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.
३. याबाबत नवीन कामांसाठी प्रस्ताव मागवण्याचे काम सुरू झाले असून, पुढील महासभेत याबाबतचा ठराव करण्यात येईल, अशीही माहिती माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी दिली. यासह उर्वरित ५८ कोटींच्या निधी मधीलदेखील अनावश्यक कामे रद्द करण्यात येतील व नगरोत्थानच्या संपूर्ण १०० कोटींच्या निधीमधून केवळ शहरातील रस्त्यांची कामे केली जातील अशीही माहिती नितीन लढ्ढा यांनी दिली.
त्या ७० कोटींच्या रस्त्यांचे कामाचे अंदाजपत्रक रखडले
शहरातील रस्त्यांच्या समस्येबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्यानंतर तत्कालीन भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी सप्टेंबर २०२० व फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महासभेत शहरात मनपा फंडातून ७० कोटींच्या निधीतून नवीन रस्ते तयार करण्याचा ठराव करण्यात आला होता. त्यादृष्टीने महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून नवीन रस्त्यांच्या कामासाठी अंदाजपत्रकदेखील तयार करण्याचे काम सुरू झाले होते. मात्र मनपात सत्तांतर झाल्यानंतर हे कामदेखील आता रखडले आहे. तसेच मनपा फंडातून होणाऱ्या कामासाठी स्थानिक ठेकेदाराने कडून फारसा प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी होती. यामुळे आमदार सुरेश भोळे यांनी मुंबई येथील एका खासगी ठेकेदाराला हे काम देण्याबाबतचा प्रस्तावदेखील मनपा प्रशासनाकडे दिला होता. मात्र मनपा सत्तांतर झाल्यामुळे हे पूर्ण काम रखडण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.