जळगाव : धरणगाव व एरंडोल तालुक्यातील सात मंडळांचाही दुष्काळी म्हणून समावेश करण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी जळगावात केली.शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी १३ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असला तरी एरंडोल व धरणगाव हे दोन तालुके वगळण्यात आले. मात्र, या दोन्ही तालुक्यातही भीषण परिस्थिती असल्याचे सुधारित पैसेवारीतून समोर आले आहे. एरंडोल तालुक्यातील एरंडोल व रिंगणगाव तसेच धरणगाव तालुक्यातील धरणगाव, साळवा, पाळधी, पिंप्री व चांदसर या ७ मंडळांमध्ये सुधारित पैसेवारी ही ५० पैशांच्या आत आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्येही दुष्काळाची दुसरी कळ लागू झाल्यानंतर ज्या ८ प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात; त्या लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे, अशीही माहिती या वेळी पालकमंत्र्यांनी दिली.केंद्राकडे साडेसात हजार कोटींचा प्रस्तावजिल्ह्यातील संपूर्ण १५०२ गावांमध्ये दुष्काळ जाहीर होईल. त्यात दुष्काळी परिस्थितीत रोख स्वरुपात जी आर्थिक मदत मिळते त्यासाठी केंद्राकडे साडेसात हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळण्याआधीच राज्याच्या तिजोरीतून मदत देण्यावर राज्य शासनाचा भर आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
उर्वरित सात मंडळांचाही समावेश करून संपूर्ण जळगाव जिल्हा दुष्काळी जाहीर करणार - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 12:10 PM