चाळीसगाव, जि.जळगाव : वसुंधरा फाउंडेशनतर्फे बालगोपाळांसाठी चित्रकार धर्मराज खैरनार यांच्या मार्गदर्शनात रंभाई आर्ट गॅलरीत पर्यावरण पूरक राखी बनवण्याची मोफत कार्यशाळा घेण्यात आली.यावेळी मंचावर डॉ.सुजित वाघ, वसुंधरा फाउंडेशनच्या अध्यक्ष धरती सचिन पवार, धर्मराज खैरनार, सचिन पवार, साहिल दाभाडे, सविता खैरनार मंचावर उपस्थित होते.कार्यशाळेची सुरवात स्व.केकी मुस यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी डॉ.सुजित वाघ यांनी या उपक्रमाचे कौतुक करत कागदापासून राखी बनवण्याचा आनंद वेगळाच असतो. या उपक्रमात तयार केलेली राखी वृक्षाला बांधून त्याला आपला भाऊ समजून आपण सर्वांनी वृक्षाचे रक्षण केले पाहिजे तरच वृक्ष वाचतील व पर्यावरणाचा ºहास रोखला जाऊ शकतो. या उपक्रमातून वृक्ष संरक्षणाचा संदेश दिला आहे. पर्यावरण पूरक राखी व वृक्ष यांचे महत्त्व जाणून घेत त्याची पर्यावरणाशी सांगड घालण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे केला जात असल्याचे प्रास्ताविक चित्रकार धर्मराज खैरनार यांनी केले.धरती पवार यांनी प्लॅस्टिकचे अनेक दुष्परिणाम पाहता पर्यावरण पूरक राखी तयार करून यासाठी जनजागृती करण्याचा मानस व्यक्त केला. कार्यशाळेत पर्यावरणपुरक राखी कशी तयार करायची याविषयी प्रात्यक्षिक व मार्गदर्शक चित्रकार धर्मराज खैरनार यांनी कागदापासून अतिशय सहजरित्या वेगवेगळ्या आकाराचे राखी बनवण्यास शिकवले. विविध आकाराचे राखी बनवून विद्यार्थ्यांनी स्व-निर्मितीचा आनंद घेतला. शिबिरात विद्यार्थ्यांनी ६८ पर्यावरण पूरक राखी बनवून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. उपस्थित विद्यार्थ्यांमधून लकी ड्रॉ काढण्यात आला. यात नेहा पिंगळे, गौरव देशमुख, दर्शिता शिरपुरे, पूर्वा चव्हाण, अंकिता पिंगळे विद्यार्थ्यांना मान्यवरांकडून बक्षीस देण्यात आले. यावेळी बापू खैरनार, साहील दाभाडे कमलेश पवार, सागर ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती.
चाळीसगाव येथे पर्यावरण पूरक राखी बनविण्याची कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 3:53 PM