स्टार ८५९
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंध काळात अनेकांच्या हाताला काम नसल्याने ते उपाशी राहू नये, यासाठी मोफत शिवभोजन थाळीचे वितरण केले जात असून आतापर्यंत जिल्ह्यात तीन लाख २८ हजार थाळींचा गरजूंना आधार मिळाला आहे. यामध्ये गरजूंचे पोट भरले गेले, मात्र राज्यस्तरावरून अनुदान येण्यास विलंब झाल्यास केंद्रचालकांना अनुदानासाठी अनेक वेळा प्रतीक्षा करावी लागत आहे. असे असले तरी जिल्ह्यातील थाळींची संख्या कमी न होता ती कायम असून मोफत शिवभोजन थाळी १५ जुलैपर्यंत मोफत देण्यास मुदतवाढ मिळाली आहे.
जिल्ह्यात २६ जानेवारी २०२० रोजी या योजनेचा शुभारंभ झाला. सुरुवातीस जिल्ह्यासाठी ७०० थाळ्यांचे उद्दिष्ट शासनाकडून देण्यात आले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये हा इष्टांक दुप्पट म्हणजेच १४०० थाळी करण्यात आला. त्यानंतर तालुका स्तरावर शिवभोजन योजनेचा विस्तार करण्यात येऊन जिल्ह्याचा इष्टांक ३ हजार ५०० थाळींपर्यंत वाढविण्यात आला होता. त्यानंतर त्यात पुन्हा दीडपट वाढ करण्यात आली.
फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट आली व कोरोनाचा हा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत १५ एप्रिलपासून विशेष निर्बंध लागू करण्यात आले. या काळात कोणीही गरीब व गरजू व्यक्ती उपाशी राहू नये, याकरिता शिवभोजन थाळी मोफत दिली जात असून जिल्ह्यातील ३८ केंद्रांवरून दररोज पाच हजार १२५ थाळींचे वितरण केले जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात तीन लाख २८ हजार लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा मोफत लाभ घेतला.
३८ शिवभोजन केंद्रांवरून दररोज वितरण
जिल्ह्यात सद्य:स्थितीत एकूण ३८ शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. त्यापैकी शहरी भागात १६ व ग्रामीण भागात २२ केंद्र आहेत. या केंद्रांवर दररोज गरजूंना शिवभोजन थाळीचा लाभ दिला जात आहे.
प्रति थाळी ४० रुपये अनुदान
शिवभोजन योजना राबवित असताना केंद्र चालकांना सरकारतर्फे अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. पूर्वी १० रुपये प्रति थाळीचे दर पाच रुपयांवर आणले होते. त्यानंतर कोरोना काळात ही थाळी पूर्णपणे मोफत दिली जात आहे. यासाठी केंद्र चालकांना प्रति थाळी ४० रुपये अनुदान दिले जाते.
अनुदानास विलंब झाला तरी थाळींची संख्या कायम
केंद्र चालकांना दिले जाणारे अनुदान काही वेळा राज्यपातळीवरूनच उशिरा येते. त्यामुळे कधी-कधी केंद्र चालकांना ते मिळण्यास प्रतीक्षा करावी लागते. जिल्ह्यातील केंद्रांना अनुदान मिळण्यास विलंब झाला तरी तो १५ दिवस ते एक महिन्यापेक्षा जास्त नसल्याची माहिती देण्यात आली. विलंब झाला तरी जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांची संख्या कायम आहे. शहरी भागात १६ केंद्रामधून १ हजार २५० थाळ्या तसेच ग्रामीण भागात २२ केंद्रामधून २ हजार १७५ थाळ्या वितरीत करण्यात येतात.
—————————
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत विशेष निर्बंध लागू असल्याने शासनाने शिवभोजन केंद्रांचा इष्टांक दीडपटीने वाढवून दिला. त्यानुसार जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ३८ शिवभोजन केंद्रांवरून थाळीचा लाभ दिला जात आहे. यासाठीचे अनुदान सहसा थांबत नाही. काही कारणास्तव अनुदान थांबले तरी ते १५ दिवस ते एक महिन्यापेक्षा जास्त वेळ थांबत नाही.
- सुनील सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी.
दररोज शिवभोजन थाळीचे वितरण सुरू आहे. यामध्ये १५ दिवसांचे बिल सादर केल्यानंतर अनुदान मिळते. कधी-कधी विलंब झाला तर १५ दिवसांचे अथवा एक महिन्याचे अनुदान थांबते.
- एक शिवभोजन केंद्र चालक.
जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र - ३८
आता किती जणांनी घेतला लाभ - ३,२८,०००