एरंडोल : येथे २९ नोव्हेंबर पासून बुधवार दरवाजा परिसरात नथ्थु बापू उरुसाला प्रारंभ होत आहे. हा यात्रोत्सव चार दिवसाचा असला तरी जवळपास ८ ते १० दिवस हिंदू-मुस्लीम हे नथू बापूंच्या दर्ग्याचे दर्शन घ्यायला व नवस फेडायला मोठया संख्येने हजेरी लावतात .उरुस कमिटीतर्फे विविध कार्यक्रमाचे यंदाही आयोजन करण्यात आले आहे . २९ नोव्हेंबर रोजी संदल मिरवणूक, ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी कुस्त्यांची दंगल, २ डिसेंबर रोजी कव्वालीचा कार्यक्रम याप्रमाणे कार्यक्रम होणार आहेत. नथ्थु बापू हे हिंदू व मुस्लिमांचे श्रद्धास्थान असल्यामुळे या ऊरुसातून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडते. या ऊरुसासाठी गुजरात, मध्य प्रदेश व इतर दूरवरच्या ठिकाणाहून भाविक नवस फेडण्यासाठी तसेच दर्शनासाठी हजेरी लावतात. भाविक कापडी घोडे, बत्तासे, शिरणी असा प्रसाद चढवितात. ४० वर्षांची परंपरा असलेल्या या उरुसाला मोठ्या संख्येने हजेरी लावावी असे आवाहन उरुस कमेटीचे अध्यक्ष रमेश परदेशी व इतर पंच यांनी केले आहे.
एरंडोलला नथ्थू बापू यांचा २९ पासून उरुस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 10:07 PM