लोकमत न्यूज नेटवर्क
एरंडोल : जळगाव जिल्ह्याला प्राप्त झालेल्या २५ हजार लसींच्या साठ्यातून एरंडोल तालुक्याला अवघ्या पाचशे सत्तर लसी प्राप्त झाल्या आहेत व आज, सोमवारपासून पुन्हा लसीकरण करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी सत्तर लसी मिळाल्या होत्या. कोरोना प्रतिबंधक लसी मोठ्या संख्येने पुरविण्यात याव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे. लसींच्या अपूर्ण साठ्यामुळे नागरिकांचा अपेक्षाभंग होऊन त्याचे पर्यवसान नाराजी व संतापात होऊ शकते, असा सूर उमटत आहे.
रविवारी प्राप्त झालेल्या लसींचे वितरण एरंडोल ग्रामीण रुग्णालय- १००, कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्र- १९०, तळई प्राथमिक आरोग्य केंद्र- १४०, रिंगणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र- १४० तसेच तीन उपकेंद्रांसाठी प्रत्येकी ४० याप्रमाणे लसींचे वितरण करण्यात आले आहे.
दरम्यान, एरंडोल तालुक्यासाठी एवढ्या कमी प्रमाणात लस उपलब्ध झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
चाळीसगावला आजपासून पुन्हा लसीकरण, १९०० डोस प्राप्त
चाळीसगाव : गेल्या आठ दिवसांपासून बंद असलेले कोरोना प्रतिबंधक लसीकरण आज, सोमवारपासून पुन्हा सुरू होत आहे. तालुक्यासाठी शनिवारी सायंकाळी १९०० डोस प्राप्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरण थांबले होते. तालुक्यातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी प्रत्येकी १४० लसीचे डोस देण्यात येणार आहेत. मेहुणबारे व चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयासाठी प्रत्येकी २५० डोस मिळणार आहेत. शहरातील दोन खासगी रुग्णालयांतही लसीकरण केले जात आहे.