एरंडोल : वाढते तापमान व ‘अंजनी’ धरणात संपुष्टात येणारा जलसाठा या पार्श्वभूमीवर एरंडोल शहराच्या पाणीटंचाई निवारण्यासाठी लमांजन आकस्मिक पाणीपुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे एप्रिल महिन्याच्या शेवटी एरंडोलकरांची तहान भागविण्यासाठी ‘गिरणा माई’ धावून येणार असल्याचे दिसून येत आहे.आतापर्यंत लमांजन योजनेअंतर्गत १८ की. मी. पैकी ८ कि.मी. लांबीची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच लमांजन बंधाऱ्यांनजीक पंप हाऊसचे बांधकाम पूर्ण नुकतेच झाले आहे.नगराध्यक्ष रमेश परदेशी, उपनगराध्यक्ष अॅड. नितीन महाजन, मुख्याधिकारी किरण देशमुख, पाणी पुरवठा विभाग प्रमुख प्रियांका जैन व दीपक गोसावी हे लमांजन योजनेचे काम पूर्ण होणे कामी परिश्रम घेत आहे त्यांना जीवन प्राधिकरणचे नेमाडे यांचे सहकार्य लाभत आहे.दरम्यान ही पाणी योजना कधी सुरु होते याबाबत एरडोलच्या नागरिकांना उत्सुकता लागून आहे.याशिवाय उमर्दे गावाजवळ पाण्याचा दाब खंडित करण्यासाठी लहान जलकुंभाचे काम प्रगतीपथावर आहे. विद्युत वाहिनी टाकण्यात आली असून ट्रांसफार्मर बसवण्याचे काम सुरू आहे. जवळपास दोन आठवड्यात लमांजन योजनेची सर्व कामे पूर्ण होऊन एरंडोल शहराला पाणीपुरवठा सुरू होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना दिलासा मिळणार आहे. सदर पाणी योजनेचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
टंचाई काळात एरंडोलला तारणार ‘गिरणामाई’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 2:04 PM