धक्कादायक : जीआरपी ना रेल्वे पोलीस नसल्याने रुग्ण पळाल्याची माहिती
जळगाव : अहमदाबादहून नवजीवन एक्स्प्रेसने आलेल्या प्रवाशाचा अँटिजेन रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे सांगितल्यानंतर या प्रवाशाने रुग्णालयात दाखल न होता थेट स्टेशनवरून पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव रेल्वे स्टेशनवर बुधवारी सकाळी घडला. दरम्यान, अँटिजेन चाचणी केंद्रावर सुरक्षिततेसाठी जीआरपी ना रेल्वे पोलिसांचा कुठलाही बंदोबस्त नसल्यामुळे या तरुणाने पलायन केले असल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे हा तरुण पळून जात असताना, जीआरपीचे पोलीस स्टेशनच्या बाहेरच उभे होते. मात्र त्यांनीही कोरोनाच्या भीतीने त्या तरुणाला पकडले नसल्याचे प्रवाशांनी सांगितले.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने, जिल्हा प्रशासनातर्फे केरळ, गोवा, राजस्थान, दिल्ली व उत्तराखंड या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची अँटिजेन चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गेल्या पाच ते सहा दिवसांपासून जळगाव रेल्वे स्टेशनवर मनपाच्या आरोग्य विभागाच्या पथकातर्फे पर राज्यातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची अँटिजेन चाचणी करण्यात येत आहे. रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळच हे पथक तैनात करण्यात आले असून, प्रत्येक प्रवाशाची या ठिकाणी नोंद करण्यात येत आहे. अँटिजेन चाचणी केल्यानंतर त्या प्रवाशाला त्या ठिकाणीच थांबवून दहा ते पंधरा मिनिटात अँटिजेन चाचणीचा रिपोर्ट देण्यात येत आहे.
त्यानुसार बुधवारी नवजीवन एक्स्प्रेसने अहमदाबादहून आलेल्या प्रवाशाची आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अँटिजेन चाचणी केली. या चाचणीत २७ वर्षीय तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
इन्फो :
पॉझिटिव्ह रिपोर्ट सांगताच तरुणाचे पलायन
मनपा आरोग्य पथकाने या तरुणाला कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे सांगून, या तरुणाला रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल होण्याचे सांगितले. यावेळी शहरातील जोशी पेठेत राहणाऱ्या या तरुणाने मला कुठलाही कोरोना झालेला नाही. मी ठणठणीत आहे, असे सांगून स्टेशनवरून पळण्यास सुरुवात केली. यावेळी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तरुणाला अडविण्याचाही प्रयत्न केला. मात्र, तरुणाने काहीएक न ऐकता घराकडे पलायन केले. विशेष म्हणजे जर या ठिकाणी रेल्वे पोलीस किंवा जीआरपीचे पोलीस असते तर तो तरुण पळाला नसता, असे प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी सांगितले.
इन्फो :
सकाळी अँटिजेन चाचणीच्या ठिकाणी रेल्वे पोलीस उपस्थित नसल्याने तो पॉझिटिव्ह रुग्ण पळून गेला. याबाबत सकाळीच स्टेशन मास्तरांना तो तरुण शोधण्यासाठी संपर्क केला होता. रेल्वे प्रशासनाने तत्काळ त्या तरुणाला शोधून आणण्यासाठी आम्ही फॉलोअप घेत आहोत.
-राम रावलानी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, मनपा
इन्फो :
रेल्वे स्टेशनवरून कोरोना पॉझिटिव्ह तरुण पळून गेल्याचे समजल्यावर मी तात्काळ रेल्वे पोलिसांना माहिती दिली आहे. त्या तरुणाला पकडून आणण्याची जबाबदारी त्यांची आहे.
-एस.एम. सनस. प्रभारी स्टेशन प्रबंधक, जळगाव रेल्वे स्टेशन