लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वैजनाथ ता.एरंडोल येथील वाळू गटातून क्षमतेपेक्षा अधिक उपसा होत असल्याची तक्रार ॲड.विजय भास्कर पाटील यांनी केली होती. तसेच वाळू गटांची मोजणी करण्याची मागणी देखील केली होती. आता जिल्हा प्रशासनाने महसूल उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत आठ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती दोन दिवसात वाळू गटाची चौकशी करून २८ रोजी अहवाल सादर करणार आहे.
हा ठेका श्रीश्री इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.तर्फे आदित्य श्रीराम खटोड यांनी घेतला आहे. हा ठेका १ हजार ४२८ ब्रास वाळू उपशासाठी होता. तेथे क्षमतेपेक्षा जास्त उपसा होत असून महसूल बुडत असल्याची तक्रार अॅड. विजय भास्कर पाटील यांनी २१ मे रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली होती. त्यानंतर ही आठ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
आठ सदस्यीय समिती गठीत
या समितीचे अध्यक्ष महसूल उपजिल्हाधिकारी आहेत. तर सदस्य म्हणून उपअधीक्षक, तालुका निरीक्षक, भूमी अभिलेख, कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांचे प्रतिनिधी, वरिष्ठ भू वैज्ञानिक भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी यांचा समावेश आहे.
या मुद्यांवर होणार चौकशी
लिलावात मंजूर खोलीपेक्षा जास्त उत्खनन झाले आहे का? पर्यावरण विषयक अटींचे पालन केले आहे का? मंजूर वाळूसाठ्यापेक्षा जास्त वाळू उपसा आणि उत्खनन झाले आहे का? या मुद्यांवर चौकशी करून २८ मे रोजी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.