लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना काळात आपला आत्मविश्वास दांडगा ठेवून व वेळेवर उपचार घेऊन जिल्ह्यातील दोनही लाटेत ८० वर्षावरील १०५० च्यावर वृद्धांनी कोरोनावर मात केली आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत त्यांच्या मृत्यूचे प्रमाणही कमी झाले असून कोरोनाला हरविणे शक्य आहे, असा संदेश कोरोनावर मात केलेल्या वृद्धांनी दिला आहे.
कोरोनाचे लवकर निदान झाल्यास त्यावर मात करणे शक्य असल्याचे वैद्यकीय तज्ञांचेही म्हणणे आहे. हा आजार अंगावर काढल्यास त्याचे भयावह परिणाम समोर येतात व तशी अनेक उदाहरणे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत समोर आली आहे. त्यामुळे लक्षणे जाणवल्यास तातडीने तपासणी करण्याच्या सूचना दिल्या जातात. पहिल्या व दुसऱ्या लाटेची तुलना केल्यास दुसऱ्या लाटेत तरूणांचे बाधित होण्याचे व मृत्यू होण्याचे प्रमाण हे वृद्धांपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. पहिल्या लाटेत वृद्धांचे मृत्यू अधिक होते. किंवा ज्यांना अन्य व्याधी होत्या अशांचे मृत्यू अधिक होते. दुसऱ्या लाटेत मात्र, अन्य व्याधी नसलेल्या अनेक तरूणांचाही मृत्यू झाला आहे.
८१ वर्षावरील एकूण पॉझिटिव्ह : १५०१, बरे झालेले १०५०
पहिल्या लाटेतील पॉझिटिव्ह: ५७६
दुसऱ्या लाटेतील पॉझिटिव्ह: ९२५
पहिल्या लाटेतील मृत्यू : १०२
दुसऱ्या लाटेतील मृत्यू : ७५
६१ ते ८० वयोगटात अधिक मृत्यू
जिल्हाभरात दोनही लाटांचा विचार केला तर ६१ ते ८० या वयोगटात सर्वाधिक मृत्यू नोंदविण्यात आले आहे. पहिल्या लाटेपेक्षा मात्र, दुसऱ्या लाटेत या वयोगटात कमी मृत्यू नोंदविण्यात आले आहे. पहिल्या लाटेत ७०४ तर दुसऱ्या लाटेत ५५६ मृत्यू या वयोगटात झाले आहेत. या मानाने तरूणांचे मृत्यू हे दुसऱ्या लाटेत वाढले आहेत.
आम्हाला कुणीही हरवू शकत नाही
मी आठवडाभर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेतले. जर वेळेवर तुम्ही आजाराचे निदान केले आणि योग्य उपचार घेतले, जगण्याची तुमची इच्छाशक्ती असली तर तुम्ही कोरोनाला हरवू शकतात. हा घाबरण्याचा आजार नाही, याचा हिमतीने सामना करावा- भागाबाई पंढरी पाटील, जळगाव
साधारण दोन महिन्यांपूर्वी मला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, न घाबरता मी सामना केला व दोन आठवडे जिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर कोविडमधून बरे झाले. कोविडवर वेळीच उपचार झाल्यास तो लवकर बरा होतो. न घाबरता लवकर तपासणी केली तर लवकर निदान होऊन उपचार घेता येतात. - जानकाबाई एकनाथ रायसिंगे, कंडारी, भुसावळ