लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा व मनपा प्रशासनाने आठवडा बाजाराला बंदी आणली आहे. मात्र, मंगळवारी आषाढी एकादशीच्या शासकीय सुटीचा फायदा घेत हरी विठ्ठलनगरात सकाळी ९ वाजेपासून आठवडा बाजार भरला होता. याबाबत मनपा प्रशासनाला माहिती मिळताच काही वेळातच मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने हा बाजार उठवून लावला आहे.
दर मंगळवारी हरी विठ्ठलनगरात आठवडा बाजार भरत असतो. मात्र, कोरोनामुळे बाजार भरण्यास बंदी असल्याने चार महिन्यांपासून चोरून-लपून याठिकाणी बाजार भरविला जात आहे. दर मंगळवारी सकाळी व सायंकाळी मनपाचे पथक याठिकाणी आधीच तैनात राहत असल्याने काही महिन्यांपासून हा बाजार भरतच नाही. मात्र, मंगळवारी आषाढी एकादशीनिमित्त शासकीय सुटी असल्याने महापालिकेचे कर्मचारी देखील रजेवर असतील, या आशेने भाजीपाला विक्रेत्यांनी हरी विठ्ठलनगर भागात सकाळपासूनच दुकाने थाटण्यास सुरुवात केली होती. सकाळी ९ वाजेपर्यंत या बाजारात विक्रेत्यांसह नागरिकांची देखील मोठी गर्दी झाली होती.
मनपाचे पथक दाखल होताच सुरू झाला गोंधळ
आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याची माहिती मिळताच मनपा उपायुक्त संतोष वाहुळे व रामानंद पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह मनपाचे पथक याठिकाणी दाखल झाले. मनपाचे पथक दाखल होताच विक्रेत्यांनी जेवढा माल जमा करता येईल तेवढा माल जमा करून, या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे या ठिकाणी चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. तसेच मनपाने विक्रेत्यांचा माल जप्त केला तर विक्रेत्यांसोबत वाद होतील म्हणून यावेळी कारवाई न करता केवळ बाजारात थाटलेली दुकाने उठविण्याच्या सूचना मनपाच्या पथकाकडून देण्यात आल्या. या सूचनेनंतरही ज्या विक्रेत्यांनी दुकाने उठविली नाहीत, अशा काही विक्रेत्यांचा माल मनपाकडून जप्त करण्यात आला. तसेच कारवाईदरम्यान विक्रेते व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये किरकोळ वाद देखील झाला.