लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : विकासाच्या नावावर महापालिकेत झालेल्या सत्तांतरानंतर तरी शहरात विकासाचे नवे पर्व सुरू होईल, अशी अपेक्षा जळगावकर बाळगून होते. मात्र, ऐतिहासिक सत्तांतरानंतरदेखील भाजपप्रमाणेच शिवसेनेत सुरू झालेल्या कुरघोडीच्या राजकारणामुळे शहरातील विकासकामांकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. शिवसेनेत एकाच वेळी अनेकांचा भरणा झाल्यामुळे आत गटबाजी व शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले असून, या राजकारणामुळे आताच्या सत्ताधाऱ्यांचे पाऊल भाजपच्याच पावलावर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मार्च महिन्यात मनपात सत्तांतर होऊन आता तीन महिने लोटले आहेत. मात्र, तीन महिन्यांत शिवसेनेचे नगरसेवक हे विकासकामांपेक्षा गटबाजीच्या राजकारणामुळेच अधिक चर्चेत आले आहेत. सद्य:स्थितीत शिवसेनेत बंडखोरांची संख्या मिळून एकूण ४५ नगरसेवक आहेत. मात्र, या ४५ नगरसेवकांमध्ये अनेक गट निर्माण झाले असून, आधीचे नगरसेवक, नवग्रह मंडळ, लढ्ढा-महाजनांचे नगरसेवक, असे अनेक गट आता शिवसेनेत सक्रिय झाले आहेत. याचा परिणाम सेनेने सत्तेत आल्यानंतर दिलेल्या आश्वासनांवर होताना दिसून येत आहे. शहराच्या विकासासाठी शासनाकडे जो पाठपुरावा असायला हवा त्या ठिकाणी गटबाजीने पोखरलेली शिवसेना आतापासूनच अपयशी होताना दिसून येत आहे.
‘त्या’ १०० कोटींवरील स्थगिती कायम?
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासाठी १६ ऑगस्ट २०१८ रोजी १०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. भाजपला या निधीचे नियोजन करता आले नाही. त्यात राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मविआच्या सरकारने या निधीवर स्थगिती आणली. आता राज्यात सेनेचे मुख्यमंत्री आहेत, तर मनपात शिवसेनेची सत्ता आहे. अशा परिस्थितीत या निधीवरील स्थगिती उठवून, नवीन कामे देऊन लवकरात लवकर शहराच्या दृष्टीने विकासकामे मार्गी लावण्याची गरज होती. मात्र, याबाबत कोणताही पदाधिकारी पुढाकार घेताना दिसून येत नाही. जिल्हाप्रमुख, महानगरप्रमुख, स्वीकृत नगरसेवक, अशा विविध पदांवरून सेनेत अंतर्गत कलह वाढत जात आहे. जुने शिवसैनिक दूर गेले, तर नवीन सदस्यांना अजूनही शहरातील संघटन तयार करता आलेले नाही.
शिवसेनेत जाणवतोय नेतृत्वाचा अभाव
१. महानगर शिवसेनेत सद्य:स्थितीत नेतृत्वाचा अभाव दिसून येत आहे. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची शहरावर मोठी पकड असल्याने सेनेतील नगरसेवकांवर एकछत्री पकड होती. मात्र, सुरेशदादा जैन हे सद्य:स्थितीत अलिप्त असल्याने जळगावच्या शिवसेनेत नेतृत्वाचा अभाव दिसून येत आहे.
२. मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, महापौर जयश्री महाजन या सेनेच्या नेत्यांपेक्षा राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसे यांच्याकडेच शहराचे गऱ्हाणे मांडत आहेत, तर नितीन लढ्ढा यांनीही सत्तांतरानंतर मनपाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. विष्णू भंगाळे यांना ग्रामीणमध्ये पसंती मिळत असली तरी शहरात जुने शिवसैनिक त्यांना स्वीकारायला तयार नाहीत.
३. उपमहापौर कुलभूषण पाटील हे आपल्याच ग्रहांसोबत मनपात ठाण मांडून आहेत, तर बाकीचे बंडखोर अजूनही सेनेत आपले अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. नेतृत्व होऊ शकणारे खान्देशची मुलूखमैदान तोफ व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हेदेखील जळगाव ग्रामीण मतदारसंघ सांभाळण्यातच आनंद मानत आहेत. त्यामुळे येत्या काळात भाजपप्रमाणे सेनेचेही ‘येरे माझ्या मागल्या’ अशीच स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.