लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणात मुळ आराखड्यात शिव कॉलनीत उड्डाण पुलाचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र नंतर परिसरातील नागरिकांच्या मागणीमुळे ऑक्टोबर २०२० मध्ये चेंज ऑफ स्कोपमध्ये या कामाचा प्रस्ताव नागपूरला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयाकडे पाठवण्यात आला. याला आठ महिने उलटले तरी अद्याप या उड्डाण पुलाला मंजुरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बायपासच्या कामाला मंजुरी देण्यात आली. मात्र शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि महामार्गावरील नेहमीच होणारे अपघात पाहता शहरातून जाणाऱ्या या रस्त्याच्या कामाला देखील मंजुरी मिळाली. या रस्त्यावर सर्वात धोकादायक चौक म्हणजे शिव कॉलनी आहे. येथे पोलिसांनीही अपघाताच्या दृष्टीने ब्लॅक स्पॉट घोषित केला आहे. तरीही चौपदरीकरणाच्या मुळ आराखड्यात शिवकॉलनीतील उड्डाणपुलाला वगळण्यात आले होते. नंतर खासदार उन्मेश पाटील यांनी पाहणी करून येथे उड्डाणपुल किंवा भुयारी मार्गाचा प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर ऑक्टोबर २०२० मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जळगाव कार्यालयाने त्याबाबतचे प्रस्ताव तयार करून प्राधिकरणाच्या सल्लागाराकडे नागपूरला पाठवले. मात्र मे २०२१ उजाडला तरीही या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
कामगार परतायला सुरूवात
लॉकडाऊनच्या काळात गावी गेलेले परप्रांतीय कामगार आता पुन्हा परत यायला सुरूवात झाली आहे. जेव्हा जळगाव जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते. तेव्हा या मार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे फक्त १६ कामगार आणि ७ कर्मचारी शिल्लक राहिले होते. मात्र नंतर हळु हळु कर्मचाऱ्यांची संख्या वाढत गेली. आता बरेच जण पुन्हा कामावर येऊ लागले आहेत. आता पुन्हा कामाला वेग मिळणार असला तरी पावसाळ्यामुळे पुन्हा किती काम होते, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. ठेकेदार संस्थेचे प्रकल्प उपसंचालक सुजितकुमार सिंग यांनी सांगितले की,‘ लॉकडाऊनच्या काळात गावी गेलेले कर्मचारी आता परत येत आहेत. मात्र आता पावसामुळे पुन्हा एकदा कामाच्या गतीवर परिणाम होऊ शकतो. जेथे पाणी असेल तेथे काम करता येणार नाही.’