लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुळे रेल्वे प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांसह अधिस्वीकृती पत्रकारांनाही प्रवासातील सवलत बंद केली आहे. मात्र, वर्ष उलटल्यानंतरही ही सवलत रेल्वेकडून बंदच ठेवण्यात आली असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमधून रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी निर्माण होत आहे. तसेच रेल्वे प्रशासनाने दुसरीकडे दिव्यांग बांधवांना रेल्वे प्रवासातील सवलत लागू ठेवली आहे. मात्र, दिव्यांग बांधवांसाठी रेल्वे गाडीत असलेला स्वतंत्र डबाच अचानक बंद केल्यामुळे दिव्यांग बांधवांचे अधिकच हाल होत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनातर्फे सध्या ५० टक्केच रेल्वे सेवा सुरू आहे. यातही सर्वसामान्य प्रवाशांना जनरल तिकीट काढून प्रवासाला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना गेल्या वर्षभरापासून रेल्वेचा प्रवास दुरापास्त झाला असताना, त्यात रेल्वे प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात ५० टक्के भाडे सवलतीची योजनाही बंद केल्यामुळे, संबंधित सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक बाहेरगावी जाण्यासाठी आजही रेल्वेच्या प्रवासालाच प्राधान्य देतात. मात्र, रेल्वे प्रवासात मिळणारी सवलत बंद असल्याने या ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण तिकीट आरक्षित करून प्रवास करावा लागत आहे.
इन्फो :
पत्रकार बांधवांनाही सवलत बंद
राज्य शासनाने अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना महामंडळाच्या बसेसमध्ये मोफत प्रवास व रेल्वेत ५० टक्के सवलती दिली आहे. वार्तांकनासाठी नेहमी बाहेरगावी जाणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना या सवलतीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. मात्र, रेल्वे प्रशासनाने अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाही रेल्वेतील सवलत गेल्या वर्षभरापासून बंद ठेवली आहे.
इन्फो :
दिव्यांग बांधवांना सवलत; मात्र डब्बाच केला बंद
रेल्वे प्रशासनाने कोरोनाचे कारण सांगून, ज्येष्ठ नागरिक व अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना सवलत बंद केली असून, दुसरीकडे दिव्यांग बांधवांना ही सवलत सुरू ठेवली आहे. मात्र, प्रत्येक एक्स्प्रेसमध्ये दिव्यांग बांधवांसाठी असलेला स्वतंत्र डबा रेल्वे प्रशासनाने गेल्या महिन्यांपासून बंद केला आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांना इतर डब्यातून व गर्दीतून प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने दिव्यांग बांधवांसाठी पुन्हा स्वतंत्र डबा सुरू करण्याची मागणी होत आहे.