राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव आगारातून कोरोनाच्या आधी दररोज ६०० फेऱ्या धावायच्या. मात्र, आता कोरोनानंतर महामंडळाची सेवा पूर्ववत सुरू झाली असली तरी, ६०० पैकी ४५० फेऱ्या सुरू असून, १५० फेऱ्या अद्यापही बंद आहेत. आगार प्रशासनातर्फे प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी फेऱ्यांची संख्या कमी असली तरी, प्रत्येक गावांना बसेस जात आहेत. यामध्ये सकाळी, दुपारी व सायंकाळी अशाप्रकारे बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच ग्रामीण भागातील विविध गावांवरून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थांच्या सोयीनुसारही बसेस सोडण्यात येत आहेत. तसेच ज्या गावांना जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असेल, त्या प्रवाशासांठी तत्काळ बसेस उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दरम्यान, जळगाव आगारातील ५० चालक-वाहक मुंबई येथे बेस्ट बस सेवेसाठी जात असल्यामुळे, मनुष्यबळ अपूर्ण पडत आहे. चालक-वाहकांची संख्या पूर्ण झाल्यावर सर्व गावांना पूर्वीप्रमाणे वेळापत्रकानुसार बसेस सोडण्यात येणार असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
दोन लाखांनी उत्पन्न घटले
जळगाव आगारातर्फे सध्या सर्व मार्गांवर बसेस धावत असल्या तरी, कोरोनामुळे अद्यापही पूर्ण क्षमतेने उत्पन्नात वाढ झालेली नाही. आगाराचे दैनंदिन उत्पन्न १० ते ११ लाखांपर्यंत असून, सध्या ८ ते ९ लाखांपर्यंत असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
प्रतिसादाअभावी प्रवासी मार्गावरही फेऱ्या कमी
महामंडळ प्रशासनातर्फे दैनंदिन फेऱ्यांची संख्या कमी केली असली तरी, सद्या सर्व मार्गावर बसेस सोडण्यात येत आहेत. मात्र, सर्वाधिक उत्पन्न असणारे औरंगाबाद, धुळे, व चाळीसगाव या मार्गावरही प्रवाशांचा पुरेसा प्रतिसाद नसल्यामुळे फेऱ्यांची संख्या कमी करण्यात आलेली आहे. प्रवाशांचा प्रतिसाद जसा वाढेल, त्याप्रमाणे बसेसची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
आगार प्रशासनातर्फे पूर्वीप्रमाणे बससेवा सुरू करण्यात आली असली तरी, शालेय विद्यार्थांसाठी सकाळपासूनच सर्व गावांमध्ये दर तासाला बसेस सोडणे गरजेचे आहे. गावात वेळेवर बस येत नसल्यामुळे विद्यार्थांची गैरसोय होत आहे.
स्वप्नील चौधरी, प्रवासी.
इन्फो :
आगार प्रशासनाने पाचोरा,चाळीसगाव या मार्गावर सकाळी सहापासूनच बसेस सोडणे गरजेचे आहे. बाहेरगावी नोकरीनिमित्त व बाजारानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना यामुळे सोयीचे होईल. यामुळे आगाराला उत्पन्नही चांगले मिळेल.
संजय पाटील, प्रवासी
इन्फो :
आगार प्रशासनातर्फे ज्या गावांना प्रवाशांचा प्रतिसाद कमी आहे, अशा गावांना फेऱ्या कमी सोडण्यात येत आहेत. सध्या पुरेशा प्रमाणात रेल्वेही सुरू न झाल्यामुळे, जवळच्या तालुक्याच्या गावांना जादा बसेस सोडत आहोत. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यावर बसेसची संख्याही वाढविण्यात येईल.
मनोज तिवारी, स्थानकप्रमुख, जळगाव आगार