आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२६ : शालेय पोषण आहाराच्या मुदतबाह्य साठ्याप्रकरणी पंचायत राज समितीने तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतरही दुसºया दिवशी गुन्हा दाखल झाला नाही. जिल्हा परिषदेच्यावतीने कोणीही फिर्याद द्यायला आले नाहीत, त्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
जिल्हा दौºयावर आलेल्या पंचायत राज समितीच्या बैठकीत शालेय पोषण आहाराचा मुद्दा चर्चेला आला होता. २०१४ मध्ये झालेल्या या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याने पंचायत राज समितीने बुधवारी जिल्हा परिषदेत पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे व एमआयडीसीचे तत्कालिन पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना पाचारण केले होते.
समोरासमोर झालेल्या चौकशीत गुन्हा दाखल करण्यासाठी जि.प.प्रशासन येणार असल्याचे लेखी पत्र कुराडे यांनी सादर केले होते. त्यामुळे फिर्याद देण्याची जबाबदारी जि.प.प्रशासनावर आहे. याची दखल घेत समितीने गुन्हा दाखल करण्यासाठी जि.प.प्रशासनाला तत्काळ फिर्याद देण्याचे आदेश दिले होते. गुरुवारी सायंकाळपर्यंत जि.प.च्यावतीने कोणीही फिर्याद द्यायला आले नाही अशी माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिरुध्द अढाव यांनी दिली. दरम्यान, मुदतबाह्य साठा प्रकरणात नेमकी काय फिर्याद द्यावी असा प्रश्न जि.प. प्रशासनाला पडला आहे तर यात कोणते कलम लावावेत याचाही प्रश्न पोलीस यंत्रणेला पडला आहे.