लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : निवृत्त शिक्षक...वय वर्षे ८१...१९७५पासून चाळीसगाव परिसरात योगाभ्यासाचा विनामूल्य प्रसार आणि प्रसार...कणकसिंग राजपूत यांनी योगविद्येला असे वाहून घेतले आहे. कोरोनासोबत आलेल्या टाळेबंदीतही योग प्रसारासाठी त्यांची पावले थांबली नाहीत. ४५ मिनिटे योगासने करा, प्राणायाम करा...अन् व्याधीमुक्त रहा. असा जागरच ते करीत आहेत. प्राणायाम व योगासने करणाऱ्याची प्रतिकारशक्ती कणखर होत असल्याने कोरोना अशा व्यक्तीजवळ फिरकूही शकत नाही. योगदिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी आवर्जून सांगितले.
बहुतांशी व्यक्तींना निवृत्तीनंतर काय करावे? असा प्रश्न पडतो. तथापि कणकसिंग राजपूत हे आ. बं. हायस्कूलमध्ये शिक्षक असतानाच त्यांनी योग अभ्यास, प्राणायाम याचेही ज्ञानामृत विद्यार्थ्यांना द्यायला सुरुवात केली. शालेय अभ्यासक्रमासोबतच ते विद्यार्थ्यांना योगाचे धडे देत. स्वतः योगासने व प्राणायाम करून दाखवत. गेल्या ५० वर्षांपासून सुरू असलेली त्यांची ही योगसाधना अखंडपणे सुरु आहे. अजूनही प्राणायाम व योगासने शिकवण्यासाठी ते उत्साहाने पहाटे जातात. योग प्रसारासाठी पायपीट असो की वेळ देणे. कणकसिंग राजपूत यांचा नकार नसतो.
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे संचालकपदही ते भूषवित आहेत. आजवर हजारो महिला-पुरुष आणि विद्यार्थ्यांना त्यांनी योगाचे धडे दिले. नियमितपणे प्राणायाम केल्याने अनेक जुनाट व्याधी, असाध्य रोग दूर होतात. हे त्यांनी सप्रमाण सिद्धही करुन दाखवले आहे. योगाचे धडे देण्यासाठी ते परजिल्ह्यात देखील जातात.
चौकट
प्राणायाम करा, कोरोनाला दूर ठेवा
दरदिवशी पहाटे ३५ ते ४५ मिनिटे योगा व प्राणायाम केल्यास शरीर ताजेतवाने होऊन मनही प्रसन्न होते. शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. फुफ्फुसाचे प्राणायाम केल्यास श्वसनाची क्रिया जलद व निर्धोक होते. शरिरात जास्त प्रमाणात ऑक्सिजन जातो.
१...सूर्यनमस्कार व प्राणायामाने शरीरातील अष्टचक्र जागृत होतात.
२..सूक्ष्म व्यायाम, ओमकार, अनुलोम - विलोम, कपालभारती, उजन्नयी, नाडीशोधन आदी प्राणायाम केल्यास श्वसनक्रिया चांगली होते.
३..कणकसिंग राजपूत हे वयाच्या ८१व्या वर्षीही दीड तास प्राणायाम करतात. प्राणायाम झाल्यानंतर शरीरातील थकवा घालविण्यासाठी १५ मिनिटांचे शवासन आवर्जून करावे, असेही ते सांगतात.
चाळीसगावात उभारले जातेय ‘योगभवन’
योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे व मीनाक्षी चंद्रात्रे व त्यांच्या स्नुषा सविता चंद्रात्रे यांचेही चाळीसगाव परिसरात ‘योग’दान आहे. गेल्या ४४ वर्षांपासून चंद्रात्रे दाम्पत्य महिला व पुरुषांना योगासने व प्राणायाम विनामूल्य शिकवितात. वसंतराव चंद्रात्रे यांनी योगावर लेखनही केले आहे.
- वसंतराव चंद्रात्रे यांच्या अथक प्रयत्नांतूनच येथील बलराम व्यायामशाळेच्या पटांगणावर जिल्ह्यातील पहिले ‘योग भवन’ उभारले जात आहे. ५० फूट लांब व ३० फूट रुंद असणाऱ्या या योग भवनासाठी ३५ लाख रुपये खर्च होणार आहे. यासाठी स्वतः चंद्रात्रे यांनी पदरझळ सोसली असून त्यानंतर समाजासमोर हात पसरले आहेत.
-योग भुवनातून योगाचे धडे देण्यासोबतच प्राणायाम याचा विनामूल्य ठेवा साधकांना दिला जाणार आहे.
- समाजाने योग भुवनसाठी दातृत्वाची ओंजळ द्यावी, असे आवाहन वसंतराव चंद्रात्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.
===Photopath===
200621\20jal_4_20062021_12.jpg
===Caption===
कणकसिंग राजपूत