जळगाव : बहूप्रतिक्षेनंतर जळगावला अखेर तीन वर्षांपासून पासपोर्ट कार्यालय सुरू झाले आहे. मात्र, तीन वर्षांनंतरही या ठिकाणी पूर्णवेळ पासपोर्ट अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे दर महिन्याला मुंबईच्या पासपोर्ट अधिकाऱ्यांची जळगावला आलटून-पालटून बदली करण्यात येत आहे. या सर्व प्रकियेमुळे अधिकाऱ्यांना चांगलाच मानसिक त्रास होत असून, दुसरीकडे यामुळे पासपोर्टचे कामही विलंबाने होत असल्यामुळे नागरिकांचीदेखील गैरसोय होत आहे.
गेल्या अनेक वर्षांत जळगाव जिल्ह्यात कुठेही पासपोर्ट कार्यालय नसल्यामुळे, येथील नागरिकांना पासपोर्टसाठी नाशिक, मुंबईला जावे लागत आहेत. त्यामुळे जळगावला पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याबाबत जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी केंद्राकडे पाठपुरावा केला होता. अखेर केंद्र सरकारने २०१८ मध्ये जळगावला पासपोर्ट कार्यालय मंजूर केल्यानंतर, मे २०१८ पासून शहरातील तहसील कार्यालयाशेजारी पासपोर्ट कार्यालय सुरू झाले आहे. या पासपोर्ट कार्यालयामुळे नागरिकांची मोठी गैरसोय टळली असून, तीन वर्षांत या ठिकाणाहून ४० हजारांहून अधिक नागरिकांनी पासपोर्ट काढले आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून या पासपोर्ट कार्यालयात एकाही पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. दर महिन्याला मुंबईहून प्रभारी अधिकारी येत आहे. दर महिन्याला पासपोर्ट कार्यालयात वेगवेगळे अधिकारी बदलून येत असल्यामुळे, नागरिकदेखील संभ्रमात पडत आहे.
इन्फो :
तीन वर्षांपासून ‘प्रभारी’राज :
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे डाक विभागामार्फत पासपोर्ट कार्यालय सुरू झाले असले तरी, या कार्यालयाचा सर्व कारभार मुंबईतील मुख्य पासपोर्ट कार्यालयाच्या माध्यमातूनच सुरू आहे. त्यामुळे मुंबईतील मुख्य पासपोर्ट कार्यालयाकडून जळगावातील पासपोर्ट कार्यालयात मुंबईहून एका अधिकाऱ्याची फक्त एका महिन्यासाठी नेमणूक करण्यात येत आहे. एक महिना झाल्यानंतर, पुन्हा या ठिकाणी मुंबईहून दुसरा अधिकारी पाठविण्यात येत आहे. अशाप्रकारे तीन वर्षांपासून या पासपोर्ट कार्यालयात पासपोर्ट अधिकाऱ्यांचे ‘प्रभारी’राज सुरू आहे. त्यामुळे पासपोर्ट कार्यालयाला पूर्णवेळ अधिकारी कधी मिळणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.
इन्फो :
आलटून-पालटून बदल्यांमुळे अधिकारी कंटाळले
जळगावातील पासपोर्ट कार्यालयात सुरुवातीपासूनच पूर्णवेळ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नसून, दर महिन्याला नागरिकांच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी मुंबईहून नवीन `पासपोर्ट अधिकारी`येत आहे. फक्त एका महिन्यासाठी नेमणूक असल्यामुळे, हे अधिकारी परिवाराला सोबत न आणता, लॉजिंग किंवा शासकीय वस्तीगृहात राहत आहेत. विशेष म्हणजे काही अधिकाऱ्यांना एक महिना झाल्यानंतर, पुन्हा सहा ते आठ महिन्यांनी जळगावला पाठविण्यात येत असते. मुंबईतील मुख्य पासपोर्ट प्रशासनातर्फे जळगावला पूर्णवेळ अधिकारी न नेमता, तीन वर्षांपासून असाच प्रकार सुरू आहे. त्यामुळे आलटून-पालटून होत असलेल्या बदल्यांमुळे या प्रक्रियेला आम्हीदेखील कंटाळलो असल्याचे येथील अधिकारी इतर कर्मचाऱ्यांकडे आपले मत व्यक्त करत आहेत.
इन्फो :
एक महिन्यासाठी माझी जळगावला बदली झाली आहे. एक महिन्यानंतर पुन्हा मी मुंबईला माझी नेमणूक होईल तर पुढील महिन्यात पुन्हा जळगावला नवीन अधिकारी येतील. पूर्णवेळ अधिकारी कधी येईल, हे माहीत नाही.
-गणेश मोगवीरा, पासपोर्ट अधिकारी, जळगाव पासपोर्ट कार्यालय.