लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : घरात कोणाचा आधार नसताना वृद्धापकाळात मदत व्हावी म्हणून आर्थिक सहाय्य करून वृद्धांना आधार देण्यासाठी असलेल्या विविध निराधार योजनांसाठी हयातीचा दाखल जमा करण्यासाठी सद्या लगबग सुरू आहे. त्यात कोरोनाचे संकट असल्याने व दाखला सादर करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत असल्याने दाखला काढणे, तो जमा करणे यासाठी थकलेल्या शरीराने वृद्धांना फिराफिर करावी लागत आहे. त्यामुळे हा दाखल सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली जात आहे.
ज्यांना मुले नाही, पतीच्या निधनानंतर निराधार झालेल्या महिला अथवा वृद्धापकाळात आर्थिक मदत व्हावी, यासाठी असलेल्या श्रावणबाळ निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना अशा विविध योजना राबविल्या जातात. याचा या वृद्धांना आधार होतो. मात्र या विविध निराधार योजनांचा लाभ घेण्यासाठी हयातीचे प्रमाणपत्र मार्चअखेरपर्यंत सादर करावे लागते. सद्यात्यासाठी वृद्धांची लगबग सुरू आहे. त्यात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आरोग्याविषयक चिंता वाढत आहे. एक तर योजनेचा लाभ बंद होऊन आधार हिरावला जाऊ नये व दुसरीकडे वयोमानानुसार संसर्गाचाही धोका होऊ नये, अशा दुहेरी विचारात वृद्ध सापडले आहेत. तरीदेखील या दाखल्यांसाठी कोरोनाच्या संकटातही वृद्धांची बाहेर पडून लगबग सुरू आहे.
कुटुंबातील सदस्यांनी दाखला दिला तरी चालेल
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने निराधार योजनांसाठी द्यावा लागणारा हयातीचा दाखला देण्यासाठी कुटुंबातील कोणी सदस्य आला तरी तो स्वीकारत असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. मात्र हयातीच्या दाखला काढण्यासाठी वृद्धांना बाहेर पडावेच लागत आहे.
कोरोनाशी कसे लढणार?
जास्त वय असल्यास कोरोना टाळण्यासाठी घराबाहेर पडू नये, असे सांगितले जात असले तरी हयातीच्या दाखल्यासाठी बाहेर पडण्याशिवाय वृद्धांना पर्याय नसल्याचे सध्या चित्र आहे. एक तर दाखला काढावा, त्यासाठी ठिकठिकाणी फिरावे, नंतर तो दाखला सादर करण्यासाठी कार्यालयात जावे, अशी सर्व प्रक्रिया वृद्धांना करावी लागत आहे. त्यामुळे वय जास्त असले तरी कोरोनाशी कसे लढावे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हे करीत असताना वृद्ध मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे, अंतर राखणे अशी काळजी घेत आहे. मात्र तरीदेखील मनात भीती असतेच, असे वृद्धांचे म्हणणे आहे.
तालुक्यातील लाभार्थी
श्रावणबाळ निराधार योजना - १२,३७४
संजय गांधी निराधार योजना - ३६९८
इंदिरा गांधी निराधार योजना - ७०७५
—————-
कोरोनाच्या संकटात वृद्धांना हयातीचा दाखला देण्यासाठी त्या-त्या गावात तलाठी कार्यालयात सुविधा देण्याचा विचार होता. मात्र तलाठी सध्या वसुलीच्या कामात असल्याने वृद्धांची अडचण होऊ नये म्हणून त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने हयातीचा दाखला आणून दिला तरी चालेल.
- के.आर. तडवी, नायब तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना
सध्या कोरोना आजाराची साथ असल्याने आम्ही वयस्कर लोकांनी कुठे फिरायचे. एकीकडे वयस्कर लोकांनी बाहेर निघू नये, असे सांगितले जात आहे. आता त्यांनाच दाखल्यासाठी बाहेर निघावे लागत आहे.
- इंदुबाई नेहते, लाभार्थी, नशिराबाद
मी अपंग योजनेचा लाभार्थी आहे. हयातीचा दाखला जमा करावयाचे आहे. मात्र हयातीचा दाखला जमा करण्यासाठी तहसील कार्यालय जळगाव येथे जावे लागत असल्यामुळे अडचण निर्माण होते.
- ज्ञानदेव बऱ्हाटे, लाभार्थी, नशिराबाद
कोरोनाचा काळ असून आम्हा वयस्क लोकांना विविध दाखले, कागदपत्रे जमा करावे लागत आहे. असे न करता यंदा तरी विनादाखल्याशिवाय आम्हाला आमच्या योजनांचा लाभ मिळाला, अशी अपेक्षा आहे.
- सुभाष गरबड बारी, लाभार्थी, शिरसोली.
हयातीचा दाखला काढण्यासाठी ई-सेवा केंद्र व इतर ठिकाणी व्यवस्था आहे. परंतु केंद्रावर गर्दी होत असल्याने कोरोना आजाराची भीती नाकारता येत नाही. त्यामुळे दाखला जमा करण्यासाठी सवलत दिली जावी.
- जनाबाई माळी, लाभार्थी, नशिराबाद