लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : कोरोनाच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अत्यावश्यक सेवांना वेळेचे बंधन घालून देण्यात आले असून अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त खासगी आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले आहेत. मात्र, गावालगतच्या लाकूड वखारी संचारबंदीतही जोमाने सुरू असल्याचे पाहून ग्रामीण भागात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर बसविले जात असल्याचे 'लोकमत'ने केलेल्या पाहणीत आढळून आले.
जिल्ह्यातील कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी संचारबंदीसह कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याशिवाय अत्यावश्यक सेवांच्या तपशिलात नमूद केलेल्या सेवांव्यतिरिक्त सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रम, सेवा या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय अत्यावश्यक सेवेतील किराणा, डेअरी, बेकरी, कृषी केंद्रे आदी बऱ्याच प्रतिष्ठानांना नव्या आदेशानुसार सकाळी ७ ते ११ या वेळेतच सेवा देण्याचे बंधन घालण्यात आले आहे. यानंतरही ममुराबाद गावातील तिन्ही लाकडाच्या वखारींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला चक्क केराची टोपली दाखवल्याचे 'लोकमत'ने केलेल्या पाहणीत निदर्शनास आले. जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या आदेशाचे इतर आस्थापना काटेकोर पालन करीत असताना, वखार मालकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसले. विशेष म्हणजे कोणत्याही वखारीत सोशल डिस्टन्सिंगसह कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे गंभीरपणे पालन झाले नव्हते. धक्कादायक प्रकार म्हणजे एकाही मजुराच्या तोंडाला मास्क किंवा रुमाल लावलेला नव्हता.
--------------------
लाकडांची वाहतूकही बिनधास्त
संचारबंदीसह कडक निर्बंध लागू असताना वखारीत कापण्यासाठी नेण्यात येणाऱ्या लाकडांची वाहतूकही अगदी बिनधास्तपणे केली जाते. वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकाराकडे कानाडोळा केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. संचारबंदीच्या काळात संबंधितांकडून जास्त बेफिकिरी दाखवली जात असल्याने वखार मालकांसह लाकूडतोड्यांचे चांगलेच फावल्याचे चित्र आहे.
-----------------
(कोट)...
जिल्हाधिकाऱ्यांचे खासगी आस्थापना बंद ठेवण्याबाबतचे आदेश अद्याप आमच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. त्यामुळे वखारीत लाकूड कापण्याचे काम सुरूच ठेवले.
- संतोष जयस्वाल, वखार चालक, ममुराबाद
---------------
फोटो-
ममुराबाद येथे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर बसवून बुधवारी दुपारी एका वखारीत अशा प्रकारे लाकूड कापण्याचे काम बिनधास्तपणे सुरू होते. (जितेंद्र पाटील)