आॅनलाईन लोकमतचाळीसगाव: दि.६ : लोकनियुक्त सरपंचपदासाठी आरक्षित जागांवर निवडणुक लढवू इच्छिणा-या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र नसले तरी आखाड्यात उतरता येणार आहे. सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र भरुन दिल्यानंतर आरक्षित जागांवर निवडणुक लढविता येईल. ग्रामविकास विभागाने ३१ डिसेंबर २०१७ च्या अध्यादेशाला २०१८ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. सदस्यांसाठीचा निर्णय मात्र मंत्रीमंडळाच्या विचाराधीन असल्याचे ग्रामविकास विभागाच्या ५ फेब्रुवारी रोजीच्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.फेब्रुवारी महिन्यात ग्रा.पं. निवडणुका होत आहे. चाळीसगाव तालुक्यातील पाच ग्रा.पं.तर चार ठिकाणी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सोमवार पासून नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झाली असली तरी पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नव्हता.राज्य निवडणुक आयोगाने २२ जानेवारी रोजी नविन अध्यादेश जाहीर केला आहे. आरक्षित जागांवर निवडणुक लढविणा-या उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्राऐवजी हमीपत्र घेण्याच्या सवलतीस शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून ३१ डिसेंबर नंतर मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आरक्षित जागांवर निवडणुक लढविणा-या उमेदवारांपुढे प्रश्ननिर्माण झाले होते. बहुतांशी उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने त्यांची अडचण झाली होती.यावर ग्रामविकास विभागाने ५ फेब्रुवारी रोजी पुन्हा हमीपत्र भरुन घेऊन नामनिर्देशन स्विकारण्याच्या ३१ डिसेंबर २०१७ च्या अध्यादेशाला फक्त सरपंचपदासाठी फेब्रुवारी २०१८ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे सरपंचपदासाठी निवडणुक लढवू इच्छिणा-या उमेदवारांचा अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांना हमीपत्र जोडून अर्ज भरता येणार आहे.सदस्यांसाठी मात्र अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. सदस्यांचे अर्ज देखील हमीपत्र भरुन स्विकारावे, यासाठीचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर ठेवण्यात आला असून त्यावर सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.
जात वैधता नसतांनाही भरता येणार सरपंचपदासाठी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 6:54 PM
सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र द्यावे लागणार भरून
ठळक मुद्देसरपंचपदासाठी सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र द्यावे लागणार भरूनअध्यादेशाला फक्त सरपंचपदासाठी फेब्रुवारी २०१८ पर्यंत मुदतवाढसदस्यांसाठी मात्र अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक