उत्स्फूर्त प्रतिसाद : लालपरीला मात्र प्रवासी मिळेनात
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुळे जिल्ह्यात तीन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून, या लॉकडाऊनमध्येही जळगावहून मुंबई व नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, तर दुसरीकडे या लॉकडाऊनचा एस. टी. महामंडळाला चांगलाच फटका बसला असून, प्रवाशांअभावी दैनंदिन फेऱ्या निम्म्याहून कमी झाल्या असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
गेल्या आठवड्यापासून राज्यात सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यात तीन दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. यामध्ये बाजारपेठा, उद्योग यांसह किराणा दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. तीन दिवस जिल्ह्यातील सर्व व्यापार व उद्योग धंदे बंद असल्यामुळे याचा एस. टी. महामंडळाच्या सेवेवर चांगलाच परिणाम झाला. जळगाव आगारातून दैनंदिन ३०० फेऱ्यांपैकी फक्त ५० ते ६० फेऱ्या झाल्या. परिणामी आधीच तोट्यात असलेल्या महामंडळाला या तीन दिवसांत चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. मात्र, तीन दिवसांत किती उत्पन्न बुडाले, याबाबत महामंडळातर्फे माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये लालपरी तोट्यात जात असताना, दुसरीकडे मात्र रेल्वेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याचे दिसून आले.
इन्फो :
मुंबई व नागपूरकडे जाणाऱ्या गाड्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
भुसावळ रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या चार दिवसांपासून जळगाव स्टेशनवरून मुंबई व पुण्याकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. यामध्ये मुंबईकडे जाणाऱ्या अमरावती एक्स्प्रेस,विदर्भ एक्स्प्रेस, कुशीनगर एक्स्प्रेस, पंजाब मेल व हावडा या गाड्यांना ५० ते १०० पर्यंत वेटिंग असल्याचे सांगण्यात आले. तर नागपूर व दिल्लीकडे जाणाऱ्या गोवा एक्स्प्रेस, संचखड एक्स्प्रेस, कर्नाटक एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस व झेलम एक्स्प्रेसलाही अनेक प्रवाशांची तिकिटे वेटिंगवर असल्याचे सांगण्यात आले. एकंदरीत लॉकडाऊनमध्ये बससेवा तोट्यात सुरू असताना, रेल्वेला मात्र कोट्यवधींचे उत्पन्न मिळत असल्याचे दिसून येत आहे.