सुशील देवकर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद उपक्रमांतर्गत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे खान्देश दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्षातील गटबाजीपुढे हतबल झाल्याचे दिसून आले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर काँग्रेस व शिवसेनेपेक्षाही राष्ट्रवादीला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातही तीच परिस्थिती आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीने आतापासूनच पुढील विधानसभा व लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. त्याउद्देशानेच प्रदेशाध्यक्षांचा दौरा आखण्यात आला. खान्देशातील दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मात्र पक्षातील गटबाजीचे उघडपणे दर्शन झाले. सुरुवात धुळ्यातच झाली. त्यानंतर जळगावात आल्यावरही त्यांना पक्षातीलच वेगवेगळ्या गटात वावरणाऱ्या नेत्यांचा वेढा पडला. एरव्ही पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाकडे फिरकूनही न पाहणारे, स्वयंघोषित नेतेही उगवले, केवळ उगवलेच नाही तर त्यांनी दौराच हायजॅक केल्याचे चित्र दिसून आले. त्याचे परिणाम या दौऱ्यातील एका मेळाव्यात जाहीरपणे उमटले.
गटबाजीचा हे प्रकार एवढ्यावरच थांबले नाहीत. जळगाव शहरात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगाव महानगरचा व जळगाव ग्रामीण-धरणगाव तालुक्याचा स्वतंत्र मेळावा घेतला. या मेळाव्यांमध्येही या गटबाजीचे दर्शन घडले.
जळगाव ग्रामीण-धरणगाव तालुक्याच्या मेळाव्यात तर धरणगावचे ज्ञानेश्वर महाजन व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यात प्रदेशाध्यक्षांसमोरच जुंपली. महाजन यांनी भाषणात मेळावास्थळी लावलेल्या बॅनरवर त्यांचा फोटो टाळण्यात आल्याचा आरोप देवकरांवर केला. तर देवकरांनी त्याचे उत्तर दिले. जयंत पाटील यांना मात्र हा जाहीरपणे चाललेला वाद-विवाद पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. अखेर त्यांनी दोघांना थांबवित वाद मिटविला.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या परिवार संवाद मेळाव्यात पदाधिकाऱ्यांचे खुर्चीचे राजकारण पाहावयास मिळाले. स्टेजवर खुर्चीसाठी चाललेली धडपड पाहून तर प्रदेशाध्यक्षही अवाक झाले. दुसऱ्या पदाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसलेल्या माजी आमदारांनी सांगूनही खुर्ची न सोडल्याने अखेर प्रदेशाध्यक्षांच्या समोरच या पदाधिकाऱ्यासाठी दुसरी खुर्ची मागविण्यात आली आणि खुर्ची न सोडणाऱ्या माजी आमदारांच्या पुढेच ती ठेवून त्या पदाधिकाऱ्याची बसण्याची व्यवस्था करण्यात आली. प्रदेशाध्यक्षांना मात्र हतबल होऊन हे प्रकार पाहण्याशिवाय पर्याय उरला नाही. तर जळगाव महानगरच्या मेळाव्यासाठी आधीच्या कार्यक्रमांमुळे विलंब झाल्याने प्रदेशाध्यक्षांकडे जास्त वेळ उरला नाही. त्यावर काही पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक प्रदेशाध्यक्षांना महानगरच्या मेळाव्यासाठी वेळ मिळू नये यासाठी विलंब केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे जर प्रदेशाध्यक्षांच्या कार्यक्रमांमध्ये ही स्थिती असेल तर जनतेचा प्रतिसाद मिळूनही राष्ट्रवादीला गटबाजीमुळे त्याचा कितपत लाभ उचलता येईल? असा सवाल उपस्थित होत आहे.