लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : यंदाचे वर्ष हे कोरोनाचे संकट घेऊन आले होते. सर्व क्षेत्रांत त्याचा मोठा फटका बसला. त्यात प्रसारमाध्यमेदेखील अपवाद राहिली नाहीत; मात्र कोरोनाच्या या काळात ‘लोकमत’ने जे काम समाजासाठी केले हेच काम संकटातही दिशादर्शक ठरले आहे, असे गौरवोद्गार मान्यवरांनी व्यक्त केले. ‘लोकमत’च्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात मान्यवरांनी कौतुक केले.
महाराष्ट्राचा मानबिंदु असलेल्या ‘लोकमत’ च्या जळगाव आवृत्तीचा वर्धापन दिन मंगळवार, १५ डिसेंबर रोजी औद्योगिक वसाहतीतील ‘लोकमत’ कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. दरवर्षी लोकमतच्या वर्धापन दिनाचा सोहळा सायंकाळी उशिराने आयोजित केला जातो; मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे, तसेच नियमांचे पालन व्हावे, यासाठी सकाळी ११ वाजेपासूनच आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. पी.पी. पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, माजी महापौर रमेशदादा जैन, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रंजना पाटील, महापौर भारती सोनवणे, महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे उपस्थित होते.
सकाळी ११ वाजता ‘लोकमत’ च्या हिरवळीवर या स्नेह मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रथम ‘लोकमत’चे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी आणि सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी वाचकांच्या प्रेममयी शुभेच्छांचा स्वीकार केला.
‘पुनश्च भरारी’ चे अनावरण
लोकमतने वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध केलेल्या ‘पुनश्च भरारी’ या वर्धापन दिन विशेष पुरवणीचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यात जळगाव जिल्ह्यातील व्यापार, उद्योग, शिक्षण यासह विविध क्षेत्रांनी कोरोनाच्या संकटातून कशी भरारी घेतली, याची माहिती या पुरवणीतून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
लोकमतने दिशा दाखवली - डॉ. उल्हास पाटील
लोकमतने कोरोनाच्या काळात सर्वांनाच दिशा दाखवली आहे. संकटकाळातही लोकमतने सर्वांना उभारी देण्याचे काम केले आहे. जेव्हा कोरोनाचा एकही रुग्ण महिनाभर डेडिकेटेड कोरोना वॉर्डात नसेल, तेव्हाच आपण खात्रीने कोरोना संपला, असे म्हणू शकतो. त्यामुळे आता लोकमतने नियमांचे पालन करून ज्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित केला हे कौतुकास्पद असल्याचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले.
नऊ महिन्यात पहिल्यांदाच बाहेर पडलो - अशोक जैन
सध्या कोरोनाच्या काळात गेल्या ९ महिन्यात आपण जैन हिल्सच्या बाहेरच पडलो नव्हतो; मात्र आज प्रथमच लोकमतच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त बाहेर पडलो आहोत. अनेक उद्योगांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. पुन्हा शहरात सुरू झालेली वर्दळ ही सकारात्मक आहे. या संकट काळात लोकमतने खरोखरच कौतुकास्पद कार्य केले आहे, असेही जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन म्हणाले.