आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१२ : अंगणात लग्नाचा मंडप टाकलेला...वधू-वरांनी हातावर मेहंदी रंगवलेली...मुलगा लग्नाची आतुरतेने वाट पाहतो... हळदीला अवघे काही तास बाकी असतानाच मेहंदी लागलेल्या नववधूने नवरा मुलाच्या घरातून पलायन केल्याची घटना मंगळवारी दुपारी दीड वाजता घडली. घोडा, बॅँड, जेवणावळी, मंडप यासह लग्नाची संपूर्ण तयारी झालेली असताना असा प्रकार घडल्याने वधू-वरांच्या मातापित्यांवर व वरावर मोठे संकट कोसळले. एकमेकाला दोष देत दोघांमध्ये वाद झाला त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले.याबाबत सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका नगरातील मुलाचे पुणे येथील मुलीसोबत लग्न निश्चित झाले होते. मुलगा व मुलगी या दोघांच्या शेजारच्या लोकांच्या मध्यस्थीने हे स्थळ जुळले होते. त्यानुसार १० नोव्हेंबर रोजी मुलगा पुणे येथे मुलगी पाहण्यासाठी गेला होता. मुलगी पसंत झाल्याने २५ नोव्हेंबर रोजी जळगावात दोघांचा साखरपुडा झाला. तेव्हाच १३ डिसेंबर ही लग्नाची तारीख काढण्यात आली होती.दोन दिवसापूर्वी मुलीचे कुटुंब दाखल१३ तारखेचे लग्न असल्याने मुलगी, तिची आई, वडील व लहान भाऊ असे चौघे जण दोन दिवसापूर्वीच जळगावात दाखल झाले. दोघांच्या संमतीने ११ डिसेंबर रोजी बस्ता झाला. त्यानंतर रात्रीतूनच नवरी मुलीचे कपडे शिवण्यात आले. तत्पूर्वी दोघांच्या हाताला मेहंदी लावण्यापासून तर लग्नाच्या गाण्यांचाही कार्यक्रम झाला. १२ रोजी सायंकाळी हळद असल्याने सकाळपासूनच अंगणात मंडप टाकण्यात आला होता. सकाळची जेवणावळीही झालेली होती.रस घ्यायला गेली अन् गायब झालीनववधूचा भाऊ आजारी असल्याने त्याच्यासाठी उसाचा रस घेऊन येते असे सांगून दुपारी साडे बारा वाजता ही नववधू एकटीच घराबाहेर गेली ती नंतर परत आलीच नाही. बराच वेळ झाल्यानंतरही वधू येत नसल्याने त्याची दोन्ही कुटुंबात चर्चा झाली. शोधाशोध केल्यानंतर वधू गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुलगा, त्याची आई व मुलीच्या आईला मोठा धक्का बसला.५० हजारात मुलीचा सौदावधू गायब झाल्यानंतर दोन्हीकडील मंडळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आली. त्यात एकमेकावर आरोप करायला लागले. मुलाला मुलगी मिळत नसल्याने ५० हजार रुपये देऊन मुलीचे लग्न निश्चित केले. त्यातही सर्व खर्च मुलाकडील मंडळींनीच उचलण्याचे ठरले होते. ५० पैकी ३० हजार रुपये मुलीच्या पालकांना देण्यात आले होते. हळद लागल्यानंतर २० हजार रुपये देण्याचे ठरले होते. दरम्यान,याबाबत मुलीच्या आईला विचारले असता फक्त लग्नाचा खर्च मुलाने करायचे इतकेच ठरले होते, आम्ही एक रुपयाही घेतलेला नाही. मध्यस्थी व मुलाकडील मंडळी खोटे बोलत असल्याचे त्यांनी सांगितले. मुलगी अल्पवयीन मुलगी अल्पवयीन असून जानेवारी महिन्यात तीला अठरा वर्ष पुर्ण होणार आहे. मुली मिळत नसल्याने मुलाकडील लोकांनी लग्नाची घाई केली. मुलगी पळून गेली याचे आम्हाला दु:ख आहे असे मुलीची आई वारंवार सांगत असताना काही समाजसेवक महिला मुलीला व लग्न जमविणा-या महिलेवर आरोप करीत होत्या. मुलगी पळून गेली म्हणून गुन्हा दाखल करावा असा आग्रह त्यांच्याकडून होत होता. मात्र मुलगी अल्पवयीन असल्याने आपणच अडचणीत येवू शकतो याची कोणीतरी जाणीव करुन दिल्याने दोन्ही गट माघारी फिरले.