प्रभाव ‘लोकमत’चा : टॉवर चौक ते नेहरू चौकदरम्यानच्या दुकानांची केली पाहणी : पुन्हा बजाविण्यात येतील नोटिसा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील हॉकर्स व इतरांवर कारवाई करणाऱ्या मनपा प्रशासनाला बेसमेंट पार्किंगचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांविरोधात पाऊले उचलण्याबाबत अखेर जाग आली आहे. बुधवारी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली मनपा नगररचना विभागाच्या अभियंत्यांनी शहरातील टॉवर चौक ते नेहरू चौकदरम्यानच्या मोठ्या दुकानांसह नाथ प्लाझामधील दुकानांचीही पाहणी केली आहे. याबाबत मूल्यांकन करून लवकरच व्यावसायिक वापर करणाऱ्यांविरोधात कडक भूमिका घेण्याची तयारी मनपा प्रशासनाने केली आहे.
बेसमेंटमध्ये पार्किंगची परवानगी असताना अनेक दुकानदारांनी त्याठिकाणी व्यावसायिक वापर सुरू केला आहे. यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला आहे. तसेच मनपाकडून दररोज हॉकर्स व इतर बांधकामांवर कारवाई होत असताना, बेसमेंटचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांविरुद्ध मनपा प्रशासन कोणतेही लक्ष द्यायला तयार नसल्याने ‘लोकमत’ने याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले. अखेर ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत महापालिका प्रशासनाने कार्यवाही करण्याची तयारी सुरू केली आहे. बुधवारी नाथ प्लाझासह ९ ते १० दुकानांमधील बेसमेंटची पाहणी केली असल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली.
नुसता नोटिसांचा फार्स नको, कारवाई हवी
बेसमेंट पार्किंगच्या विषयावर वाद वाढू लागल्यानंतर मनपा प्रशासनाकडून नेहमी बेसमेंटचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांना नोटिसा देऊन वेळ मारून नेण्याचे काम केले जाते. मात्र, याबाबत चर्चा व वाद कमी झाल्यानंतर मनपाकडून पुढे कोणतीही कारवाई केली जात नाही. याआधीदेखील अनेकवेळा या प्रकरणी नोटिसा देण्यात आल्या आहेत. मात्र, कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे आतादेखील केवळ नोटिसांचा फार्स करून कारवाई टाळण्यात येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.