सुनील पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महिला पोलिसांचे कामाचे तास चार तासांनी कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना कुटुंबाला वेळदेणे शक्य होत असून त्यांच्यापेक्षा मुलांनाच त्याचा जास्त आनंद होत आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी गेल्या आठवड्यातच याबाबत निर्णय घेऊन त्याची तातडीने अमलबजावणी करण्याचे आदेशही घटकप्रमुखांना दिले आहे. महासंचालकांच्या या निर्णयाचे पोलीस दलातील महिलाच नाही, तर सर्वसामान्य नागरिकांमध्ये देखील समाधान व्यक्त होत आहे.
पोलीस दलाची ड्युटी म्हणजे २४ तास ते बांधील असतात. त्यात महिला असो की पुरुष असा भेदभाव नाहीच. प्रसुती रजा व आजारपण सोडले तर प्रत्येक वेळी कर्तव्यावर हजर असणे बंधनकारक आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असो किंवा गुन्ह्यांचा तपास, वाहतूक नियंत्रण, गार्ड ड्युटी, अंगरक्षक यासह वरिष्ठ जो आदेश देतील, त्याचे पालन करणे क्रमप्राप्त आहे. पोलीस दल शिस्तीचे खाते मानले जाते, त्यामुळे या खात्यात अधिकारी असो किंवा कर्मचारी यांना काम केल्याशिवाय पर्याय नाहीच. आवाज उठविता येत नाही. अशा रोजच्या कटकटीतून महासंचालकांनी महिला वर्गाला दिलासा दिला आहे. इतकेच काय फेसबुकवरही ते थेट पोलीस दलातील शिपायापासून तर अधिकाऱ्यापर्यंत संवाद साधत आहेत.
महिलांना आता आठ तासाची ड्युटी केल्याने त्यांच्यात खूपच आनंदाचे वातावरण असून त्यांना कुटुंबासोबत वेळ घालवता येणे शक्य होऊ लागले आहे.
जिल्ह्यातील एकूण पोलीस ठाणे -३६
एकूण पोलीस -३२५२
महिला पोलीस -३१२
आता आईसोबत रोज खेळता येणार
आई रोज लवकर घरी यायला लागल्याने खूप आनंद होत आहे. घरातील कामे आटोपल्यावर आमच्यासोबत वेळ घालवते. आईसोबत रोज खेळता येते, त्यामुळे खूप मज्जा येते. रोज अशीच ड्युटी असायला पाहिजे, असे आम्हाला वाटते.
-अथर्व किशोर माळी
पूर्वी आई रोज उशीरा घरी यायची. आता लवकर येते. त्यामुळे आम्हा दोघं भावांना खूप आनंद होत आहे. संध्याकाळी आम्ही आईसोबत गल्लीत तर कधी बाहेर फिरायला जातो. पाणीपुरी, आईस्क्रीम खायला मिळते. रात्रपाळीची ड्युटी नसल्याने खूपच आनंद झाला. दिवसपाळीच्या ड्युटीतदेखील आई आता लवकर यायला लागली. आमच्यासोबत वेळ घालवायला लागली.
-समृध्दी महेंद्रसिंग परदेशी
सर्वात आधी ज्यांनी महिला पोलिसांच्याबाबत सहानुभूर्तीपूर्वक विचार करुन कामाचे तास कमी केले, अशा महासंचालकांचे आभार मानले पाहिजे. पोलीस खात्यात ड्युटीची वेळ नसल्याने ते कुटुंबाला वेळच देऊ शकत नाही. आता या निर्णयामुळे आई लवकर घरी येणार असल्याने कुटुंबातील सर्वांनाच आनंद झाला आहे.
-रोहीत संजय पाचपांडे