जळगाव : जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी गुरूवारी सकाळी एरंडोल येथे भेट देऊन मतमोजणी कक्षाची पाहणी केली. याप्रसंगी ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूमच्या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी तीन कर्मचारी जागेवर नसल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीची तयारी करण्यात आली आहे. तसेच मतमोजणीसाठीचे ईव्हीएम त्या-त्या विधानसभा मतदार संघात निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या मार्गदर्शनात सील करून स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आलेले आहेत. तेथे चोवीसतास पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे. गुरूवारी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे हे एरंडोल, पाचोरा, जळगाव ग्रामीण मतदार संघासाठी धरणगाव येथील मतमोजणी स्थळावरील तयारीच्या पाहणीसाठी गेले. पाचोरा येथील पाहणी आटोपून जिल्हाधिकारी एरंडोल येथे पोहोचले. त्यावेळी मतमोजणी स्थळाची पाहणी करून नंतर स्ट्राँग रूमकडे गेले. मात्र जिल्हाधिकारी येऊन दहा मिनिटांचा कालावधी उलटला तरीही या स्ट्राँग रूमच्या ठिकाणचे बंदोबस्ताला असलेल्या पोलीस कर्मचाºयांपैकी तिघे जागेवर आलेले नव्हते. केवळ एक कर्मचारी उपस्थित होता. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी तेथील रजिस्टरमध्ये याबाबत शेरा मारून पोलीस अधीक्षकांशी फोनवरून संपर्क साधून या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच कारवाई करण्याचे आदेश दिले.नावे देण्यास पोलीस निरीक्षकांचा नकारजिल्हाधिकाºयांनी कारवाईचे आदेश दिलेल्या कर्मचाºयांबाबत विचारणा केली असता एरंडोलचे पोलीस निरीक्षक अरूण हजारे यांनी नावे देण्यास नकार दिला. जेव्हा कारवाई होईल, तेव्हा बघू, असे उद्दाम उत्तर ‘लोकमत’ प्रतिनिधीला दिले. यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्याशी संपर्क साधला असता ‘मी दिवसभर बाहेर होतो. अहवाल मागविला आहे. अहवाल आल्यावर कारवाई करू’ असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.मी एरंडोलला मतमोजणी स्थळी पाहणी केली. तेथे जाऊन दहा मिनिटांचा कालावधी उलटला तरीही स्ट्राँगरूमवर बंदोबस्तासाठी असलेले कर्मचारी जागेवर आलेले नव्हते. केवळ एक कर्मचारी उपस्थित होता. याबाबत पोलीस अधीक्षकांना फोनवरूनच संपर्क साधून संबंधीत कर्मचाºयांवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. -डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी.
ईव्हीएम स्ट्राँगरूम बंदोबस्तात हलगर्जीपणा तीन पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 1:09 PM