लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या बीज भांडवल योजनेतील अपहार प्रकरणात अटक केलेला एजंट संदीप प्रभाकर सावळे (वय ३६, रा.भुसावळ) याने आधी अटक केलेल्या संजीव वसंत सोनवणे याच्याकडून अपहाराची १ कोटी ३ लाख रुपयांची रक्कम घेतलेली आहे. या रकमेची विल्हेवाट कशी लावली, यात आणखी कोणाचा सहभाग आहे याबाबत उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याचे पोलिसांनी रविवारी न्यायालयात सांगितले. दरम्यान, या गुन्ह्याची व्याप्ती पाहता सावळे याला पुन्हा दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २३ जून रोजी सावळे याला भुसावळातून अटक केली होती. रविवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले होते. सावळे याचे महामंडळात स्वत:च्या नावाने एक प्रकरण असल्याचे उघड झाले आहे. आधी अटक केलेला संजीव सोनवणे याने त्याने त्याच्या बँक खात्यात जमा झालेली रक्कम ही संदीप सावळे याच्या भुसावळ येथील कॉसमॉस बँकेच्या खात्यात ६ लाख ५७ हजार रुपये इतकी रक्कम आरटीजीएस याप्रणालीद्वारे वळवली आहे. संजीव सोनवणे याला अटक झाली तेव्हापासून सावळे हा फरार झालेला होता. पोलिसांनी त्याच्या भुसावळ येथील घरी अनेक वेळा छापा टाकला असता तो मिळून आलेला नव्हता. त्याच्यासोबत आणखी काही साथीदार आहेत. सोनवणे याच्या बँक खात्यावर आलेली एक कोटी तीन लाख रुपये ही रक्कम सावळे याला दिलेली असून, त्याच्याप्रमाणे इतरांनीही सावळे याला रक्कम दिल्याचा संशय आहे.
१२ जणांच्या खात्यात वर्ग केली रक्कम
संदीप सावळे याने अपहराची रक्कम १० ते १२ जणांच्या बँक खात्यात वर्ग करुन घेतली असून, या लोकांनीही इतरांच्या खात्यात वर्ग करून नंतर काढली आहे, या लोकांचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, सावळे याने शिव कॉलनीतील स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस खाते उघडले असून, त्यातही अपहाराची रक्कम वर्ग केली करून ती रक्कम काढली व नंतर हे बँक खातेच बंद केले. कोणकोणाच्या नावाने त्याने अशी बोगस खाती उघडली आहेत त्यांची माहिती संकलित केली जात असल्याचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी सांगितले.