दिव्यांग बोर्ड : बुधवार ठरला जीएमसीसाठी गोंधळाचा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेल्या दिव्यांग तपासणीच्या पहिल्याच दिवशी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दिव्यांग बांधवांची तपासणीसाठी गर्दी झाली होती. दिवसभरात २२२ जणांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, यात मानसिक आजाराच्या ४० रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, दिव्यांग बोर्ड तसेच विविध घटनांमुळे जीएमसीला छावणीचे स्वरूप आले होते.
वैद्यकीय तपासणी सकाळी ९ ते १ वाजेदरम्यान करण्यात आली. तपासणी मुख्य गेट नं. २ कडील अधिष्ठाता कार्यालयासमोरील दिव्यांग मंडळाच्या कार्यालयात तसेच ओपीडी कक्षात झाली. दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष डॉ. मारुती पोटे, मंडळाचे सचिव तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित यांच्यासह तज्ज्ञ डॉ. नेहा भंगाळे, डॉ. योगेश गांगुर्डे, डॉ. योगेंद्र नेहेते, डॉ. दिलीप महाजन, डॉ. विनोद पवार, डॉ. प्रसन्न पाटील, डॉ. गिरीश राणे यांनी दिव्यांगांची तपासणी केली. कर्मचारी गोपाळ सोळंकी, चेतन निकम, दत्तात्रय पवार, आरती दुसाने यांनी सहकार्य केले. दरम्यान, मानसोपचार विभागाकडे मोठी गर्दी यावेळी झाली होती.
अपंग तरुणी स्ट्रेचरवर
पारोळा तालुक्यातील होळ पिंप्री येथील संगीता कसबे यांना हाडांचा आजार असून त्यांना चालणे कठीण होते. अशा स्थितीत त्यांना स्ट्रेचरवरच या ठिकाणी तपासणीसाठी आणले होते.
आजपासून कूपन वाटप
पुढील आठवड्यात दोनशे दिव्यांग बांधवांची तपासणी होणार असून यासाठी कुपन पद्धती सुरू करण्यात आली आहे. यात गुरूवार २९ जुलैपासून वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयात हे कूपन वाटले जाणार आहे. २०० कूपन नंतर आलेल्यांना त्यापुढील आठवड्याची तारीख देण्यात येणार आहे.