जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवारपासून तब्बल ९ महिन्यांनंतर कोरोनामुळे थांबलेले दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे कामकाज अखेर सुरू झाले. दिव्यांग मंडळात पहिल्याच दिवशी सुमारे ८० दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवारपासून दिव्यांग मंडळ अद्ययावत सुविधांसह कार्यान्वित झाले आहे. दिव्यांग मंडळ अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना दर बुधवारी प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही सुरू झाली. सकाळी ८ वाजेपासून नाव नोंदणी करण्यासाठी दिव्यांग बांधवांनी उपस्थिती दिली होती. त्यांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी सकाळी १० ते १ वाजेदरम्यान करण्यात आली. सकाळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत पहिल्या लाभार्थ्याची तपासणी करण्यात आली. तपासणी मुख्य गेट नं. २ कडील अधिष्ठाता कार्यालयासमोरील दिव्यांग मंडळाच्या कार्यालयात झाली. तपासणीसाठी कुठलीही फी आकारली जात नाही. पहिल्या दिवशी अस्थिव्यंग, नाक-कान, मानसिक व इतर प्रकारचे दिव्यांगत्व असलेल्या सुमारे ८० दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली.यांनी केली तपासणीयावेळी उपअधिष्ठाता तथा दिव्यांग मंडळाचे समन्वयक डॉ. मारुती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार यांच्यासह तज्ज्ञ डॉ. आस्था गनेरीवाल, डॉ. सचिन अहिरे, डॉ. विजय कुरकुरे, डॉ. स्वप्नील कळसकर, डॉ. दिलीप महाजन, डॉ. अक्षय सरोदे, डॉ.प्रसन्न पाटील यांनी दिव्यांगांची तपासणी केली. कर्मचारी गोपाल सोळंके, चेतन निकम, दत्तात्रय पवार यांनी सहकार्य केले.