जळगाव : शहरात कडाक्याची थंडी असताना सेंट जोसेफ स्कूलने थंडीची पर्वा न करता सकाळी साडे आठ ते 11.30 दरम्यान मैदानावर दहावीच्या विद्याथ्र्याची पूर्व परीक्षा घेतल्याने पालक व विद्याथ्र्यानी तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत काही पालकांनी दूरध्वनीवरुन ‘लोकमत’कडे तक्रारीही केल्या. दरम्यान, स्कूलच्या मुख्याध्यापिका अलका डिसुजा यांनी मात्र मैदानावर नव्हे तर सभागृहात परीक्षा घेतल्याचा दावा केला आहे.
विद्यार्थी व पालकांनी सांगितले की, सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शुक्रवारपासून 10 वी च्या पूर्व परीक्षेस सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळी साडे आठ वाजता समाजशास्त्राचा पहिला पेपर घेण्यात आला. परीक्षेदरम्यान विद्यार्थी कॉपी करतात. कॉपी करता येवू नये म्हणून शाळा प्रशासनाने ही परीक्षा थेट वर्गात न घेता मैदानावर घेण्याचा अजब निर्णय घेतला. गेल्या तीन-चार दिवसांपासून जळगावात थंडीची लाट आली असताना सकाळच्या वेळेस ही परीक्षा थेट मैदानावर घेतल्याने विद्याथ्र्याना त्रास सहन करावा लागला. केवळ एक-दोन विद्यार्थी कॉपी करतात म्हणून याची शिक्षा सर्व विद्याथ्र्याना का दिली? असा प्रश्न पालकवर्गाकडून विचारला जात आहे. शाळेच्या या प्रकारामुळे पालक वर्गाकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गैरसमजातून झाला प्रकारयाबाबत ‘लोकमत’ ने सेंट जोसेफ स्कूलच्या मुख्याध्यापिका अलका डिसुजा यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, हा प्रकार गैरसमजातून झाला आहे. परीक्षा ही मोकळ्या मैदानात न घेता बंदिस्त सभागृहात घेण्यात आली. कडाक्याची थंडी असल्याने मोकळ्या मैदानावर परीक्षा घेणे शक्यच नाही.