लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील दुसऱ्या टप्प्यात १ लाख ६५ हजार २३३ विद्यार्थ्यांनी २१५ विषयांच्या परीक्षा यशस्वीपणे दिल्या. २ मार्च ते १७ मार्च या कालावधीत ऑनलाइन झालेल्या या परीक्षेत ९० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून ऑनलाइन परीक्षा घेतल्या जात आहेत. गतवर्षी अंतिम वर्ष अंतिम सत्राच्या परीक्षा ऑनलाइन झाल्यानंतर आता शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील दुसऱ्या टप्प्यात प्रथम वर्ष प्रथम सत्राच्या नियमित प्रथम वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापनशास्त्र, बी.एस.डब्ल्यू., बी.पी.ई., ई-परीक्षांचा अंतर्भाव होता. प्रथम टप्प्यातील परीक्षा ५ जानेवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत विविध ४२३२ विषयांची झालेली ही परीक्षा ५ लाख ६८ हजार ७६९ एवढ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने दिली. या झालेल्या परीक्षांमध्ये ज्या विषयांना प्रात्यक्षिक परीक्षा नाहीत त्यांचे निकाल जाहीर करण्याची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. या सर्व परीक्षांचे आयोजन विद्यापीठाने स्वत: केले. प्रभारी कुलगुरू प्रा.ई. वायुनंदन यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या परीक्षांसाठी परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील, सर्व अधिकार मंडळे, विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि सर्व आयटी को-ऑर्डिनेटर यांच्या सहकार्यामुळे या परीक्षा यशस्वीपणे पार पडल्या.
तिसरा टप्पा २५ मेपासून
तिसऱ्या टप्प्यात पदव्युत्तर प्रथम वर्ष प्रथम सत्राच्या परीक्षा २५ मे पासून घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांनी दिली. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षावेळी येणाऱ्या अडचणी विद्यापीठाकडून तत्काळ सोडविल्या जात आहेत.