लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील हिवाळी परीक्षांना ७ लाख ३४ हजार ०२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यांनी ४ हजार ४८० विषयांच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने दिल्या. या सर्व परीक्षा ऑनलाईन पध्दतीने सुरळितपणे व यशस्वीरित्या पार पडल्या असून त्यांचे निकाल ही जाहीर करण्यात आले आहेत.
विविध विद्याशाखा व अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील हिवाळी परीक्षा माहे ऑक्टोबर,नोव्हेंबर,डिसेंबर-२०२० च्या तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या नियमित व प्रथम वर्षाच्या बॅकलॉग विषयांच्या परीक्षा आणि दोन वर्षीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षासोबत प्रथम वर्षाच्या बॅकलॉगसह परीक्षा ५ जानेवारी ते १७ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या. २ ते १७ मार्च, २०२१ या कालावधीत पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या सत्र-१ च्या नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आल्या होत्या. या अभ्यासक्रमाच्या प्रात्याक्षिक परीक्षा देखील ३१ मार्च २०२१ पावेतो ऑनलाईन माध्यमातून आयोजित करण्यात आल्या.
या विषयांचे निकाल जाहीर
या परीक्षांपैकी प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष बी.ए.,बी.कॉम.,बी.एस्सी. बी.व्होक., बी.एस.डब्ल्यू., बी.ए.बी.सी.जे, डी.पी.ए., व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या सर्व वर्गाच्या पदवी आणि पदव्युत्तर, एम.ए., एम.कॉम., एम.एस.डब्ल्यू., एम.ए. एम.सी.जे., शिक्षणशास्त्र विद्याशाखेतंर्गत सर्व अभ्यासक्रम, विद्यापीठातील प्रशाळा व विभागांमधील सर्व अभ्यासक्रम, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे एफ.ई, एस.ई., टी.ई. आणि बी.ई., औषधीनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या सर्व वर्गाचे, बी.टेक. कॉस्मेटीक इत्यादी परीक्षांचे निकालही तात्काळ जाहीर करण्यात आलेले आहेत.
यांचे लाभले सहकार्य
प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षांचे यशस्वी आयोजन करण्यात आले असून, यासाठी विद्यापीठ अधिकार मंडळाचे सदस्य, अधिष्ठाता, सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य , मान्यताप्राप्त परिसंस्थांचे संचालक, विद्यापीठ प्रशाळांचे संचालक, विभाग प्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी सांगितले.