ऑनलाइन लोकमत
फैजपूर (ता. यावल) दि. 20 - ऐतिहासिक भूमीत 14 व्या युवारंग महोत्सवाचे उद्घाटन सिने अभिनेता संदीप पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवाला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य डॉ.पी.पी. पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, सावदा नगराध्यक्ष अनिता येवले, माजी खासदार गुणवंतराव सरोदे, मसाका चेअरमन शरद महाजन, प्रभारी कुलसचिव ए.बी.चौधरी, कार्याध्यक्ष दिलीप रामू पाटील, संचालक सत्यजीत साळवे, सुमन पाटील, श्यामला सरोदे, प्रा. संजय सोनवणे, विद्यापीठ प्रतिनिधी विशाखा महाजन, धनश्री चंदोड, डिगंबर पवार, धनाजी महाविद्यालयाचे चेअरमन लिलाधर चौधरी, दामोदर पाटील, समन्वयक ए.आय.भंगाळे आदींची उपस्थिती होती.
संदीप पाठकांनी जिंकली मने
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ढोल-ताशांचा गजर, एनसीसी विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध पथसंचलन तसेच विद्यार्थिनींनी लेझीम खेळत युवा अभिनेता संदीप पाठक यांच्यासह मान्यवरांचे स्वागत केले. संदीप पाठक यांचे व्यासपीठावर आगमन होताच तरुणांनी टाळ्या व शिट्या वाजवून त्यांचे स्वागत केले. तसेच युवारंग गीत याचवेळी सुरू झाल्याने तरुणाई अनेकवेळपर्यंत थिरकली. व-हाड निघालंय लंडणला या प्रयोगातील काही गमतीदार किस्से तसेच मराठी अभिनेता स्वर्गीय नीळू फुले यांचा भारदस्त आवाज काढून पाठक यांनी तरुणाईची मने जिंकली.
कुलगुरू प्राचार्य पी.पी.पाटील म्हणाले की, माझ्या तालुक्याच्या भूमीत युवारंग होत असल्याचा अभिमान आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून माझा ऊर अभिमानाने दाटून आला आहे. विद्यापीठातील एम.ए.नृत्यविभाग बंद झाला असून तो पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील तसेच खान्देशातील १०४२ लोककलावंत शोधून काढले आहे. या कला जिवंत ठेवण्यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात लोककला अकादमी सुरू करण्याचा मानस आहे.
राज्य शासनाकडे त्याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे. विद्यापीठाच्या विविध योजनांची त्यांनी माहिती दिली. कॅशलेस सोयायटी प्रदर्शनीचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.