फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : जिल्ह्यातील सहकार तत्त्वावर सुरू असलेला व रावेर, यावल तालुक्याचा मानबिंदू ठरलेल्या मधुकर सहकारी सहकार कारखाना ऊस उत्पादक शेतकरी कामगार सर्वसामान्यांसाठी सुरू राहावा ही तर काळाची गरज असल्याची आंतरिक भावना व्यासपीठावरील सर्वच नेत्यांनी बोलून दाखवली. निमित्त होते कारखान्याच्या ४४ व्या वार्षिक सभेचे. या वेळी सभासदांमध्ये काही विषयांवरून शाब्दिक चकमक उडाली व त्यांनी संचालकांना धारेवर धरले. या वेळी आमदार हरिभाऊ जावळे यांनी खाली सभासदांमध्ये येऊन सभासदांना शांत केले व विषयावर पडदा पडला. सभेत सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.या वेळी राजकारणाचे जोडे बाहेर काढून ‘मधुकर’च्या अस्तित्वासाठी एकत्रित येण्याची ग्वाही आमदार हरिभाऊ जावळे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन शरद महाजन होते. रविवारी कारखाना कार्यस्थळावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर आमदार हरिभाऊ जावळे, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, माजी आमदार रमेश चौधरी, माजी आमदार अरुण पाटील, व्हाईस चेअरमन भागवत पाटील, जिल्हा बँक संचालक गणेश नेहते, जिल्हा दूध संचालक हेमराज चौधरी, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन नरेंद्र नारखेडे, यांच्यासह सर्व संचालक व मान्यवरांची उपस्थिती होती.प्रास्ताविकात चेअरमन शरद महाजन यांनी कारखान्याची सध्याची आर्थिक स्थिती व येणाऱ्या अडचणी यावर भाष्य केले. त्यांनी त्या हंगामात शेतकºयांना पूर्ण एफआरपीनुसार रक्कम दिल्याचे सांगून ६५ कोटींचा संचित तोटा, पाण्याचे दुर्भिक्ष्य, आर्थिक देणी यामुळे ‘मधुकर’ला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जिल्हा बँकेने पूर्वहंगामी कर्जासाठी शासनाची थक हमी मागविली आहे. त्यासाठी आमदार जावळे, माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. येत्या हंगामात तीन लाखाचे गाळप होईल, अशी आशा व्यक्त केली.आमदार जावळे यांनी मधुकर अडचणीत असताना त्यावर राजकारण करणे योग्य नाही. कारखाना सुरू करण्यासाठी जिल्हा बँकेने पूर्वहंगामी कर्ज देण्यासाठी शासनाची थकहमी मागितलेली आहे. ती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असून ती लवकरच मिळेल, असे सांगत माजी आमदार शिरीष चौधरी व आम्ही निवडणुकीच्या वेळी आरोप-प्रत्यारोप करू, पण कारखान्यात राजकारण आणणार नाही याची ग्वाही देत मधुकरच्या अस्तित्वासाठी एकत्रित येण्याचे आवाहन केले.माजी आमदार शिरीष चौधरी यांनीसुद्धा आमदार जावळे यांच्या भूमिकेला समर्थन देत मधुकर टिकविणे हे सर्वांचेच कर्तव्य असल्याचे सांगत त्यात आम्ही मागे राहणार नाही, असा शब्द दिला. यावेळी विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. मागील सभेचे इतिवृत्त वाचन प्रभारी कार्यकारी संचालक तेजेंद्र तळेले यांनी केले. आभार व्हाईस चेअरमन भागवत पाटील यांनी मानले, तर सूत्रसंचालन कामगार संघटनेच्या अध्यक्ष किरण चौधरी यांनी केले.
फैजपूर येथे किरकोळ वाद वगळता ‘मसाका’ची सभा शांततेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 1:27 AM
‘मधुकर’ सुरू राहणे गरजेचे : मान्यवरांनी केल्या भावना व्यक्त
ठळक मुद्देराकेश फेगडे यांनी अहवालावर बोलताना ऊस उत्पादकांना साडेपाचशेपर्यंतचा जादा भाव अपेक्षित होता, तो द्यावा, अशी मागणी केली, तर एका सभासदाने सर्व संचालक तज्ज्ञ असताना तोटा का, असा प्रश्न उपस्थित केला.माजी संचालक नितीन राणे यांनी कारखान्यात नियोजन शून्य कारभार सुरू असल्याने तोट्यात वाढ झाल्याचा आरोप केला. या वेळी वातावरण थोडे तापले होते.कामगार संघटनेचे माजी अध्यक्ष अरुण महाजन यांनी आपल्या मनोगतात उपस्थितांना चिमटे काढत सद्य:स्थितीवर कठोर भूमिका आवश्यक असल्याचे सांगितले.