जळगाव: अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी प्राप्त अनुदानाचे वितरण करण्यात दिरंगाई केल्याने चार तहसीलदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये एरंडोल, पाचोरा, भडगाव आणि पारोळा तहसीलदारांचा समावेश आहे. या चारही तहसीलदारांकडून खुलासा मागविण्यात आला आहे.
अनुदान वाटपाचा दैनंदिन अहवाल प्रशासनाने तहसीलदारांकडून मागविला होता. त्यात वरील चार तालुक्यात दिरंगाई झाल्याचे लक्षात आले. एरंडोल तालुक्यात केवळ ६०.०८ टक्के अनुदानाचे वाटप झाले असून पाचोरा तालुक्यात ७४.९० टक्के, भडगाव तालुक्यात ७४.५४ टक्के, पारोळा तालुक्यात ८१.१९ टक्के अनुदानाचे वाटप झाले आहे. त्यामुळे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांच्या आदेशानुसार चारही तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.