विजयकुमार सैतवाल
जळगाव : वाळू उपशाला कोठेही परवानगी नसताना जळगाव शहरासह जिल्हाभरात वाळूचा सर्रास उपसा होत असल्याने गिरणा नदीपात्राचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सततच्या वाळू उपशामुळे नदीपात्राची खोली वाढत असून, रुंदीदेखील वाढत आहे. यामुळे परिसरातदेखील धोका निर्माण होत असून, पर्यावरणाचे होणारे हे नुकसान कधीही न भरुन निघणारे आहे, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे.
पात्र रूंदावल्याने परिसरात पसरते पाणी
बेसुमार वाळू उपशामुळे गिरणा नदी पात्राची रुंदी व खोलीदेखील वाढत आहे. पात्रातील रुंदी जिल्ह्यात कोठे कमी-जास्त होते; मात्र सरासरी ३०० मीटर रुंदी असलेली रुंदी आता ३२० ते ३२५ मीटरपर्यंत वाढली असल्याचे चित्र आहे. पात्राची रुंदी वाढल्याने पावसाळ्यात नदीला पूर आला की नदीचे पाणी आजूबाजूला पसरून परिसरात धोका निर्माण होऊ पाहत आहे. अवैध वाळू उपशामुळे नदीपात्रही विस्कटले जात असून, त्यामुळे आजूबाजूच्या शेतात पावसाळ्यात नदीचे पाणी शिरते व शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसतो.
पोलीस व महसूल कर्मचारी तैनात
वाळू उपशाविरोधात आव्हाणे येथील शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर नदी परिसरात सीसी टीव्ही बसविण्याची घोषणा करण्यात आली होती; मात्र प्रत्यक्षात ते बसलेच नाहीत; मात्र आव्हाणे, निमखेडी परिसरात पोलीस व महसूल कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
वाळूच्या बेसुमार उपशामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. यात नदीपात्राची रुंदी, खोली वाढून नदी पात्राच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. नदीची खोली वाढताना ती वेगवेगळ्या ठिकाणी कमी-अधिक असल्याने ही खोली जीवघेणी ठरत आहे. यासोबतच पाणी साठून न राहता दुष्काळाचे संकट उभे राहते.
- बाळकृष्ण देवरे, पर्यावरण तज्ज्ञ
बेसुमार वाळू उपशामुळे नदी पात्र तर धोक्यात येतच आहे, सोबतच शेतीलाही त्याचा फटका बसत आहे. एकतर पावसाळ्यात शेतात पाणी शिरण्याची भीती असते व वर्षभर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे शेतरस्तेही खराब होऊन शेतात जाणे कठीण होते.
- हर्षल चौधरी, शेतकरी.