लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गिरणा नदीपात्रातून ज्या पद्धतीने अवैध वाळूचा उपसा होत आहे, त्याच पद्धतीने वडली, डोमगाव व म्हसावद परिसरातील नद्या व नाले पोखरून वाळूचा उपसा केला जात आहे, याकडे मात्र महसूल व पोलीस यंत्रणेचा काणाडोळा होत आहे. बेसुमार वाळू उपाशामुळे नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. दिवस-रात्र २४ तास हा वाळूचा उपसा सुरू आहे.
वडली, पाथरी व डोमगाव गावांना मिळणाऱ्या नदीतून ठिकठिकाणाहून वाळूचा उपसा केला जात आहे. त्याशिवाय म्हसावद रस्त्यावरील कुरकुर नाल्यातूनही मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होत आहे. गिरणा नदीतील वाळूच्या बरोबरीनेच या नद्यांची वाळू असल्याने त्याला मोठी मागणी आहे. जेसीबी, ट्रॅक्टर लावून वाळूचा उपसा केला जात आहे. गल्लोगल्ली ट्रॅक्टर पळविले जात असल्याने अपघाताचा धोका वाढलेला आहे. ट्रॅक्टरचालकांना जी व्यक्ती बोलायला गेली, त्यांना चालकांकडून दम भरला जात आहे. वावडदा, वडली, जळके, विटनेर, पाथरी, डोमगाव, जवखेडा, वराड, लोणवाडी, सुभाषवाडी व वसंतवाडी या गावांमध्ये वाळूची विक्री केली जात आहे.
इतर अवैध धंदे बोकाळले
वाळूप्रमाणेच सट्टा, पत्ता गावोगावी सुरू झाला असून, याकडे तरुणपिढी वळली आहे. कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात सट्टा, पत्ता प्रथमच खुल्या जागेत सुरू झाले आहेत. यावरून यंत्रणेच्या परवानगीनेच हे धंदे सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे. शिरसोली, म्हसावद दूरक्षेत्राच्या हद्दीत या धंद्यांनी डोके वर काढले आहे. सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्याकडून कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे. पोलीस स्टेशन किंवा स्थानिक गुन्हे शाखा अवैध धंद्यावर कारवाई करू शकत नसल्याचे नागरिक उघडपणे बोलू लागले आहेत.
--