जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात निरोप देण्यातील गोंधळामुळे दोन नवजात शिशुंची अदलाबदल झाली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला. पालकांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. मंगळवारी, सकाळी ही घटना घडली. दरम्यान, प्रशासनाने दोन्ही बाळांना ताब्यात घेत नवजात अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. डीएनए टेस्टद्वारे आता खरे पालक निश्चित केले जाणार आहेत.
जीएमसीमध्ये प्रसूतीसाठी सुवर्णा सोनवणे (वय २०, टहाकळी, भुसावळ) आणि प्रतिभा भिल ( वय २०, कासमपुरा, पाचोरा) या दोन्ही गरोदर महिला भरती झाल्या होत्या. त्यांची प्रकृती अत्यावस्थ होती. झटके येत होते. त्यामुळे त्यांचे तातडीने सिझर करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाच मिनिटांच्या अंतराने दोघींचे सिझर झाले. एकीला मुलगा व दुसरीला मुलगी झाली. पण नवजात शिशु पालकांकडे सोपविताना निरोप देण्यातील गोंधळामुळे त्यांची अदलाबदल झाली. अर्ध्या तासाने ही चूक उघड होताच प्रसूती कक्षात एकच गोंधळ उडाला. दोन्ही नवजात शिशुंचे पालक आक्रमक झाले. त्यांनी डॉक्टर व परिचारिकांना धारेवर धरले. मुलगा व मुलगी नेमकी कोणत्या पालकांची हेच ठरेना.
वाद वाढत चालला असल्याने पाहून प्रशासनाने दोन्ही नवजात शिशुंना आपल्या ताब्यात घेतले. त्यांना नवजात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. खरे पालक शोधण्यासाठी आता दोन्ही शिशु आणि मातांची डीएनए टेस्ट केली जाणार आहे. त्यासाठी पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. दोन्ही माता अतिदक्षता विभागात दाखल आहेत. रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणी चौकशी समिती गठीत केली आहे.
डीएनए चाचणी रक्ताच्या नमु्न्यांच्या आधारे केली जाते. हे नमुने नाशिक येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविले जातात. त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जीएमसीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी दिली.
जीएमसीमध्ये नवजात शिशुंची आदलाबदल झाल्याची एका पालकाची तक्रार पोलिसांकडे आली आहे. त्या अनुषंगाने जीएमसीशी पत्रव्यवहार करून बाळांची डीएनए चाचणी करून घेतली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पेठ पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांनी दिली.