लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव सीए शाखेचा पदग्रहण सोहळा रविवारी उत्साहात झाला. या वेळी प्रशांत अग्रवाल यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. या सोबतच उपाध्यक्ष तसेच सचिव म्हणून सौरभ लोढा, कोषाध्यक्ष तसेच विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष म्हणून विकी बिर्ला यांनीही पदभार स्वीकारला. आयसीएआय भवन येथे झालेल्या या पदग्रहण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश भोळे, माजी खासदार ईश्वरलाल जैन उपस्थित होते. मावळते अध्यक्ष सागर पाटणी यांनी अग्रवाल यांच्याकडे पदभार सोपविला. या सोबतच पाटणी यांनी मागील वर्षामध्ये केलेल्या विविध कामांचा आढावा सादर केला. जळगाव सीए शाखेला व जळगाव शाखेला डब्ल्यूआयआरसी लेव्हलला दुसऱ्या क्रमांकाचा बेस्ट ब्रँच अवार्ड आणि जळगाव विद्यार्थी शाखेला राष्ट्रीय स्तरावरसुद्धा तिसऱ्या क्रमांकाचा बेस्ट अवार्ड मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी वर्षात सीए सभासद, कार्यकारीणी सदस्य, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने विविध विषयांवर सेमिनार, तालुका स्तरावर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर असे विविध उपक्रम घेण्यासह सीए शाखेला उज्ज्वल यश मिळवून देऊ, असे नवनियुक्त अध्यक्ष अग्रवाल यांनी सांगितले. सीए उत्तीर्ण झालेल्या २५ विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सोबतच कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. फेसलेस इन्कम टॅक्स असेसमेंट या विषयावर झालेल्या चर्चासत्रात ॲड. अभय अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन ममता राजानी यांनी केले.