जळगाव : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण असून बाजारात वाहन खरेदी व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीचीही मोठी लगबग दिसून येत आहे. तसेच सोने-चांदी खरेदीकडेही ग्राहकांचा कल वाढत आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर ७०० दुचाकी तर ४०० चारचाकींची विक्री होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. इलेक्ट्रॉनिक्स बाजारातही या वेळी एसी, एलईडी, वॉशिंग मशिनला सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाचे सर्व बंधने दूर झाल्याने यंदा खरेदीचा अधिच उत्साह आहे. साडेतीन मुहूर्तांसह अनेकजण घटस्थापनेलाही विविध वस्तू खरेदी करतात. त्यानुसार अनेकांनी वाहनांसह इलेक्ट्रॉनिक्स् वस्तूंचे बुकिंग केले आहे. मनाजोगे वाहन व वस्तू मिळाव्या म्हणून मोठ्या प्रमाणात बुकिंग केले असून घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात खरेदी होणार असल्याचा अंदात विक्रेत्यांनी वर्तविला आहे. सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या विविध कंपन्यांकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहे. अर्थसाहाय्य तसेच भेटवस्तू देण्यासह एक्सचेंज ऑफरही असल्याने याचाही ग्राहक मोठ्या प्रमाणात फायदा घेत आहेत.
चारचाकींना वाढली मागणी
चारचाकींच्या बाजारात मोठा उत्साह दिसून येत असून नवरात्रोत्सवाला सुरुवात होताच किमान ४०० चारचाकी रस्त्यावर येण्याचा अंदाज आहे. शहरातील एकाच शोरुमध्ये पावणे चारशे चारचाकींचे बुकिंग झाले आहे. इतर शोरुमचे मिळून एकूण एक हजार चारचाकींचे बुकिंग आहे. मात्र अनेक गाड्या उपलब्ध नसल्याने किमान ४०० गाड्यांची डिलिव्हरी होणे अपेक्षित आहे.
७०० दुचाकींची विक्री होणार
दुचाकीच्या एकाच शोरुमध्ये १५० दुचाकींचे बुकिंग झाल्याचे सांगण्यात आले. इतर सर्व शोरुमचे मिळून किमान ७०० दुचाकींची विक्री होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यामध्ये मोपेड गाड्यांना अधिक पसंती असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले. दुचाकीमध्येही अनेक मॉडेलसाठी वेटिंग आहे.
इलेक्ट्रॉनिक्स बाजारही गजबजला
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठीही बाजार गजबजला आहे. एसी, एलईडी, वॉशिंग मशिनला अधिक पसंती दिसून येत आहे. त्या खालोखाल ओव्हन व अन्य होम अप्लायन्सेसला मागणी आहे. या वस्तूंचे मोठ्या प्रमाणात बुकिंग झाले आहे.
सुवर्ण खरेदीला झळाळी
पितृपक्ष पक्ष संपताच घटस्थापनेच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात खरेदी होणार असून चांदीचे पूजा साहित्य, लहान मूर्ती, मुकूट, छत्र, सिंहासन यांना मागणी असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.
स्वप्नातील घर होणार साकार
घटस्थापनेच्या मुहूर्तावर अनेक जण गृहप्रवेश करणार असून अनेक जण या मुहूर्तावर बुकिंग करणार आहेत. नवरात्रोत्सवात किमान १०० ते १५० घरांची विक्री होण्याचा अंदात वर्तविला जात आहे.
सुवर्ण खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढत असून घटस्थापनेच्या मुहूर्तावर चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. चांदीच्या विविध वस्तूंना मागणी वाढली आहे. - भागवत भंगाळे, सुवर्ण व्यावसायिक
बांधकाम साहित्याचे दर कमी झाल्याने घरांचे दर नियंत्रणात येणार आहे. त्यामुळे घरांना मागणी वाढली असून नवरात्रोत्सवात घरांची विक्री होण्यासह बुकिंग होऊ शकते. - सुनील मंत्री, बांधकाम व्यावसायिक.
कोरोनानंतर चारचाकींना चांगलीच मागणी वाढली आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात बुकिंग झाले आहे. - उज्ज्वला खर्चे, विक्री व्यवस्थापक
दुचाकी खरेदीसाठी मोठा उत्साह असून आमच्याकडे १०० दुचाकींची डिलिव्हरी होणे अपेक्षित असून इतर दुचाकींचे बुकिंग आहे. मात्र अनेक मॉडेलसाठी वेटिंग आहे. - अमित तिवारी, महाव्यवस्थापक.