लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्यांना पोलीस ठाण्याची वारी करावी लागत आहे. त्यामुळे अनेक जण आता तंदुरुस्त राहण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. त्यात नागरिकांनी घरच्या घरीच व्यायाम प्रकार करावेत आणि तंदुरुस्त रहावे, असे आवाहन क्रीडा प्रशिक्षकांनी केले आहे. तसेच त्यांनी तंदुरुस्तीचे मार्ग देखील सांगितले आहेत.
सध्याच्या काळात बाहेर फिरणे हे कठीण झाले आहे. बाहेर जाऊन आल्यावर आपण कोरोना विषाणु घरात तर आणत नाही ना, याची भिती सर्वांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक जण बाहेर जाणे टाळत आहेत. त्यामुळे काहींचे वजन वाढत आहे. त्यामुळे आता अनेक जण घरीच व्यायाम करण्यावर भर देत आहेत. त्यात छतावर चालणे, दोरीवरच्या उड्या, वॉर्मअप जम्पिंग, घरातील जिने चढ उतर करणे, यासारख्या व्यायामांवर भर देण्याचा सल्ला देखील प्रशिक्षक देत आहेत.
कोट -
योगा, सुर्यनमस्कार करु शकतो, पायऱ्यांवर वर खाली येणे हे इतर व्यायाम करु शकतो. कार्डियो रनिंग वगळता इतर सर्व व्यायाम प्रकार घरच्या घरीच करता येतात - डॉ.रणजीत पाटील, क्रीडा शिक्षक, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय.
घरच्या घरीच व्यायाम करावा, पायऱ्यावर चढ उतार करणे, तसेच इतर व्यायाम प्रकार करावे, नागरिकांना तंदुरुस्तीसाठी सध्याच्या काळात बाहेर फिरणे टाळले पाहिजे. - प्रवीण पाटील, क्रीडा शिक्षक, खुबचंद सागरमल विद्यालय.
काय करावे ?
सर्व सांध्यांच्या सुक्ष्म हालचाली कराव्यात, घरातच चालावे, ज्यांना गुडघेदुखीचा त्रास नाही आहे ते सुर्यनमस्कार करु शकतात. आठवड्यातून तीन वेळा जलनेती शुद्धी क्रिया करावी, ही कोविडच्या काळात खुप उपयोगी आहे. आसनांमध्ये गोमुखासन, उष्ट्रासन, धनुरासन, पश्चिमोत्तानासन, वज्रासन, मकरासन ही सर्वांसाठी उपयोगी ठरतील. मकरासन हे पोटावर झोपून करायचे आसन आहे. भुजंगासन, नौकासन यामुळे कोविडच्या उपचारांसाठी पुरक आसन ठरतात. विरासन आणि ताडासन, वृतक्षासन यांचा प्राणायम आणि मेडिटेशन करावे, प्राणायाम करावा.
- डॉ. आरती गोरे, योग समुपदेशक