लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सातपुडा पर्वतरांगेतील मनुदेवी वनक्षेत्र परिसरातील ऐतिहासिक गायवाडा आपल्या अस्तित्वाच्या शेवटच्या घटका मोजत आहे. अफगाण आक्रमणकारी अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणाच्या जखमा घेत आपले अस्तित्व टिकवून ठेवलेल्या गायवाडा परिसरात अतिक्रमणधारकांनी शेकडो वृक्षांची कत्तल करून, या ठिकाणची जमीन शेतीसाठी बळकावण्याचा घाट घातल्याची बाब समोर आली आहे.
यावल तालुक्यातील आडगाव येथून काही अंतरावर श्रीक्षेत्र मनुदेवी तीर्थक्षेत्र आहे. मनुदेवीला जाताना निसर्गरम्य ठिकाण आतून भाविक, भक्त, निसर्गप्रेमी यांना याच निसर्गाच्या सानिध्यातून जावे लागते. परंतु, तेच निसर्गरम्य ठिकाण आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. कारण ह्याच सातपुडाच्या सानिध्यात असलेल्या वनसृष्टीवर काही वन तस्करांची वक्रदृष्टी पडून ही सृष्टी नाहीशी केली जात आहे.
सागवानची तस्करी सुरूच, वणवा लावण्याचे प्रकार येताहेत समोर
मनुदेवी वनक्षेत्र परिसरासह चोपडा व यावल तालुक्यातील सातपुडा परिसरात सागवान वृक्षांचे मोठ्या प्रमाणात जंगल आहे. सागवानला बाजारात मोठी मागणी असल्याने काही वर्षांपासून या भागात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून, सागवानाची तस्करीदेखील केली जात आहे.
गायवाडा परिसरातही वृक्षतोड करून लावल्या जाताहेत आगी
मनुदेवी मंदिराच्या वरच्या भागात गायवाडाचे अस्तित्व आढळून येते. या ऐतिहासिक क्षेत्राकडे अजूनही जिल्हा व वन प्रशासनाने हवे तसे लक्ष दिलेले नाही. या वाड्यात आता काही प्रमाणात भिंती व काही पुरातन अवशेष आढळून येतात. या खोलगट भागात मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल आहे. मात्र, याचठिकाणी वन माफियांनी अतिक्रमण करून वृक्षांची कत्तल सुरू केली आहे. तसेच गेल्या आठवडाभरापासून या भागात आगदेखील लावण्यात आली आहे.
पाच हजार हेक्टर क्षेत्राची जबाबदारी दोन कर्मचाऱ्यांकडे
वन विभागात अनेक जागा रिक्त असल्याने अशा घटनांकडे वन विभागाकडून आवश्यक लक्ष दिले जात नसल्याचे पाहावयास मिळत आहे. मनुदेवी वनक्षेत्र असलेल्या पाच हजार हेक्टर क्षेत्रासाठी केवळ दोनच वन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन कर्मचार्यांवर पाच हजार वनक्षेत्राची जबाबदारी असल्याने अशा वृक्षतोडीकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचेही पाहायला मिळत आहे.
कोट..
मनुदेवी-गायवाडा परिसरात गेल्या २-३ दिवसांपासून मानवनिर्मित वणवा सुरू आहे. स्थानिक पर्यावरणप्रेमींनी वेळोवेळी वन विभागाला कळवूनही आग विझविण्यात वा आगीवर वन विभागाला नियंत्रण मिळवता आलेले नाही. ह्या परिसरावर परप्रांतीयांकडून वारंवार अतिक्रमणासाठी प्रयत्न सुरू आहे. वन विभागाने अनेकवेळा त्यांचे प्रयत्न हाणून पाडले असले तरी अपुऱ्या मनुष्यबळामुळे अतिक्रमणासाठी प्रयत्नशील असलेल्या परप्रांतीयांकडून या परिसरातील जंगलाची अतोनात हानी सुरू आहे. या विषयाकडे प्राधान्याने लक्ष घालून सातपुड्याची होणारी कत्तल थांबवावी. मनुदेवी गायवाडा परिसराला जैवविविधता दृष्टीकाेनातून महत्त्व आहेच. परंतु, तेथे असलेल्या १२ व्या शतकातील गवळीराजाच्या वाड्याच्या अवशेषांमुळे ताे भाग विशेष महत्त्वाचा आहे. अशाचप्रकारे आगी व अतिक्रमण सुरू राहिल्यास ऐतिहासिक गायवाडा व तेथील वैभवशाली जंगल नामशेष होण्यास वेळ लागणार नाही.
- रवींद्र फालक, मानद वन्यजीव रक्षक, अध्यक्ष, वन्यजीव संरक्षण संस्था, जळगाव